*
मुंबई, दि. २० : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाची दखल घेत मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेसाठी रील्स अपलोड करण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
मृद व जलसंवर्धनाबाबत नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच या विषयाशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी यापूर्वी १९ ऑगस्ट २०२६ पर्यंत रील्स अपलोड करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती.
मात्र, क्षेत्रीय स्तरावर या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रील्स तयार करून अपलोड करण्यासाठी उपलब्ध झालेला कमी कालावधी लक्षात घेऊन स्पर्धेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत रील्स अपलोड करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मृद व जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशातून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्येही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००


