*
पुणे, दि. २४: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेचा सन २०२६-२७ साठी लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल २५ लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. समान निधी योजनेंतर्गतच्या इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे अन्य योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.
असमान निधी योजनेंर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार याकरिता लाकडी फर्निचर खरेदीकरिता ४ लाख रुपये तसेच इमारत बांधकामाकरिता १० ते १५ लाख रुपये (प्रस्ताव फक्त एकदाच), ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी २ लाख ५० हजार व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण २ लाख रुपये, महोत्सवी वर्ष (५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष) साजरे करण्यासाठी ६ लाख २० लाख व इमारत विस्तार १० लाख रुपये, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी १ लाख ५० हजार किंवा २ लाख ५० हजार किंवा ३ लाख रुपये, ‘बालकोपरा’ स्थापन करण्याकरीता ६ लाख ८० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या https://www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावा. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारेही पाठविण्यात यावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
0000


