पुणे, दि. २९ : ‘हिस्टॉरिक सिटी सीरीज २०२६’ या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘ऐतिहासिक शहरांचे सांस्कृतिक भविष्यवेधी पुनरुज्जीवन’ या कार्यशाळेचे आयोजन महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) नुकतेच करण्यात आले. ‘हिस्टॉरिक सिटी सीरीज’मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागसह, पुणे महापालिका, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, द्रोणाह फौंडेशन, आयकोमॉस इंडिया, हेरिटोपोलिस, बीएनसीए, अल्ट्रीम पब्लिशर्स, राज्य पुरातन विभाग (पुणे), इंटॅक (पुणे) डेक्कन कॉलेज आणि ब्रिक्स आर्किटेक्चर महाविद्यालय यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. तो हेरिटेज वॉक, चर्चासत्र, तज्ज्ञांची भाषणे आणि प्रकल्प निर्मिती या माध्यमांतून साजरा करण्यात आला.
या कार्यशाळेचे समन्वयक राज्य पूरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे आणि आंतरराष्ट्रीय वारसा प्रशिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या उपाध्यक्षा आणि बीएनसीएतील संस्कृती अध्यायन केंद्रप्रमूख डॉ. वैशाली लाटकर; तर प्रा. सौरभ मराठे यांनी या कार्यशाळेचे सहसमन्वयक म्हणन काम पाहिले. त्यांच्यासह प्रतिक्षा दळवी आणि शिवराज दांगट यांचाही सहयोग मिळाला.
कार्यशाळेचे उद्घाटन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या संचालक डॉ. देबोलिना कुंडू यांनी केले. तर द्रोणाह संस्थेच्या पारूल मुंजाल यांनी विचार मांडले.
डॉ. कुंडू म्हणाल्या की, बदलत्या शहरी विकासाचा ताण हा पर्यायाने वारसा जतनावर येताना दिसतो. वास्तविक ऐतिहासिक वारसा जतनाचे कार्य हे शहरी विकास कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग आहे. या कार्यशाळेतून मार्गदर्शन तसेच विविध विचारांची देवाण घेवाणीचा उपयोग पुढील वारसा नियोजनासाठी होईल.
बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभदा कमलापूरकर म्हणाल्या की, शहरांमधील ऐतिहासिक वारशांचे पुनरुज्जीवन हा महत्वाचा विषय असून ते सांस्कृतिक भूदृश्यकला विकासाचे महत्वाचे माध्यम आहे. प्रत्येक शहर, जिल्हा ते तालुका हे त्या अर्थाने भविष्यासाठी पूरक व उपयुक्त काम करू शकते. यावेळी बीएनसीएचे उपप्राचार्य व इंटॅक संस्थेचे मुख्य सहयोगी डॉ. शार्वेय धोंगडे उपस्थित होते.
डॉ. वैशाली लाटकर म्हणाल्या की, ऐतिहासिक वारसा जतन करताना बांधकामातील सांस्कृतिक घटकांचाही प्रामुख्याने विचार करावा लागेल, तसेच त्यामध्ये विविध कारागिरी व स्थानिक तज्ज्ञ व समुहांच्या भागीदारीचा सहभाग घेणे आवश्यक असेल.
डॉ. वहाणे यांनी कोल्हापुर आणि पंढरपूर मंदिरांच्या संवर्धनाचा आढावा घेऊन सांगितले की, नागरिक म्हणून प्रत्येक पुरातन वस्तू, वास्तूचे वारसा मूल्य ओळखले पाहिजे. आजच्या शाश्वत विकास कामात ऐतिहासिक वास्तूंना व सांस्कृतिक संसाधनांनाही सामावून घेणे गरजेचे आहे. यासाठी ऐतिहासिक वारशावर प्रेम करणारे गट एकत्र आले पाहिजेत.
कार्यशाळेत संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या ३५ वारसा प्रेमींनी शनिवार वाडा ते महात्मा फुले मंडई या ‘हेरिटेज कॉरीडॉर’ संबंधीचा नवीन प्रस्ताव तयार केला. यावेळी पुणे महापालिका ऐतिहासिक वारसा विभागप्रमूख मंदार धायगुडे, सहाय्यक अभियंता शैलेशकुमार वाघोलीकर तसेच सुनील मोहिते यांच्यासह संभाजी पुलाजवळील ऐतिहासिक विठ्ठल मंदिराचे कोशाध्यक्ष दीपक थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. मराठे आणि डॉ. अजित आपटे यांनी पुण्यातील ऐतिहासिक मार्गिकेचे पैलू उलगडून दाखवले. तसेच कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यामध्ये दिल्लीतील दिवय गुप्ता, द्रोणाहच्या डॉ. शिखा जैन, मुंबईतील वारसा तज्ज्ञ कीर्तीदा उनवाला, ऐतिहासिक स्थळांसंदर्भात दिव्यांगांसाठी लागणाऱ्या सुगम्यतेवर डॉ. रचना खरे, अहमदाबादमधील वर्ल्ड सिटी कार्पोरेशनचे माजी संचालक आशिष त्र्यंबाडिया, संस्कृतीसंबंधित यूसीएलजी समितीचे अध्यक्ष पॅस्क्युएल जॉर्डी आणि बंगलोरचे बिक्रमजीत चक्रबोर्ती यांचा समावेश होता.


