पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने आठवा आदर्श माता पुरस्कार ज्योती कदम, स्वाती निम्हण, सुनीता लांजेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला विधानपरिषद सदस्य आमदार नीलम गोऱ्हे, सामाजिक कार्यकर्त्या ममता सपकाळ, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा आठवे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ज्योती कदम या मातोश्री आहेत. तर, नगरसेवक सनी निम्हण यांच्या मातोश्री स्वाती निम्हण या दुस-या पुरस्कारार्थी आहेत. तसेच तिस-या पुरस्कारार्थी सुनीता लांजेकर या सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या मातोश्री आहेत. विविध क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वांना घडवून समाजसेवेचे धडे दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या मातांना गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जात आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


