पुणे,31 ऑगस्ट 2026 : पुणे स्थित फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन (एफएफडीआरएफ) ने केलेल्या एका नव्या अभ्यासात लठ्ठपणा असलेल्या भारतीयांमध्ये टाईप 2 मधुमेहाशी संबंधित महत्त्वाचे चयापचयाशी निगडीत घटक व वैद्यकीय घटक स्पष्ट झाले आहेत.हा अभ्यास फ्रंटियर्स इन क्लिनिकल डायबेटिस ॲन्ड हेल्थकेअर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रकाशित करण्यात आला. ( https://doi.org/10.3389/fcdhc.2026.1809646) अभ्यास करणाऱ्या टीम मध्ये सौ.अनघा व्यवहारे,डॉ.प्रमोद त्रिपाठी, डॉ.निधी कदम,डॉ.दिप्तीका तिवारी,सौ.बेबी शर्मा,डॉ.तेजस काथ्रीकोली,डॉ.मल्हार गानला आणि डॉ.बन्शी साबू यांचा समावेश होता.
टाईप 2 मधुमेह हा चयापचयाशी संबंधित आजार असून दक्षिण आशियामधील लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.मात्र लठ्ठपणा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मधुमेह होतोच असे नाही.या अभ्यासात लठ्ठपणा असलेल्या भारतीयांमध्ये टाईप 2 मधुमेहाशी संबंधित,चयापचयाशी निगडीत, सूज संबंधित आणि औषधोपचारांशी संबंधित घटकांचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासामध्ये 1028 व्यक्तींच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले.यामध्ये टाईप 2 मधुमेह असलेल्या व नसलेल्या व्यक्तींच्या वय आणि लिंगानुसार जुळवलेल्या 514 जोड्या होत्या.सर्व सहभागी प्रौढ व लठ्ठपणा असलेले होते आणि त्यांनी जून २०२० ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत एफएफडीच्या लाईफस्टाईल इंटरव्हेंशन प्रोग्राममध्ये भाग घेतला होता.
अभ्यासात बीटा सेल्सची कमी झालेली कार्यक्षमता व यामुळे इन्सुलिन तयार करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर झालेला विपरीत परिणाम हे टाईप 2 मधुमेहाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे घटक असल्याचे दिसून आले.इन्सुलिन प्रतिरोधकता (रेझिस्टंन्स) हाही मधुमेहाशी संबंधित महत्त्वाचा घटक दिसून आला.याशिवाय एचडीएल कोलेस्ट्रॉलची कमी असलेली पातळी, सूज चे सूचक असलेल्या एचएससीआरपीची वाढलेली पातळी,लठ्ठपणा (बीएमआय २५.० ते २९.९) आणि उच्च रक्तदाबासाठी औषधांचा वापर यांचाही समावेश होता.
अभ्यास करणाऱ्या टीमने टाईप 2 मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्ती ओळखण्यासाठी या घटकांच्या आधारावर एक सांख्यिकीय मॉडेल (स्टॅटिस्टिकल मॉडेल) तयार केले.या मॉडेलची 966 व्यक्तींच्या स्वतंत्र गटावर चाचणी करण्यात आली आणि त्यातूनही समान स्वरूपाचे निष्कर्ष मिळाले.
अभ्यासकांच्या मते मधुमेहाचा धोका ओळखताना केवळ लठ्ठपणा हा एकच निकष पुरेसा नाही.इन्सुलिन प्रतिरोधकता,बीटा सेल्सची कार्यक्षमता आणि इतर चयापचयाशी संबंधित घटक समजून घेतल्यास मधुमेहाचा धोका असलेले व्यक्ती ओळखणे आणि त्यांच्यासाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे शक्य होऊ शकते.
हे मॉडेल नियमित वैद्यकीय वापरात आणण्यापूर्वी त्याचा अधिक व्यापक स्तरावर आणि विविध लोकसंख्येमध्ये स्वतंत्र पडताळणी तसेच दीर्घकालीन अभ्यास आवश्यक आहे.


