पुणे, दि. ३ : दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच त्याबाबतचा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत प्रथम, दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत द्वितीय तसेच मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीच्या वेळी तृतीय पडताळणी मतदार यादी निरीक्षक यांच्याकडून करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांचा पुणे जिल्हा भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील चौथ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक ३ येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना काही सूचना अथवा अडचणी असल्यास त्या बैठकीपूर्वी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था
मतदार यादी निरीक्षक यांच्या पुणे जिल्हा भेटीदरम्यान मतदार नोंदणी तसेच मतदार यादीच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भेटीच्या कालावधीव्यतिरिक्त मतदार नोंदणीसंदर्भातील अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे NGRS Portal तसेच जिल्हास्तरावरील कॉल सेंटर क्रमांक १९५० उपलब्ध आहे.
मतदारांनी मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती अथवा इतर अडचणींबाबत आपल्या तक्रारी व सूचना संबंधित यंत्रणेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मतदार यादी निरीक्षक यांच्या भेटीच्या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


