Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्मा*

 

 

*यशदा येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन*

 

पुणे, दि. १० : नागरी सेवेत कार्यरत असताना देशाच्या राज्यघटनेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, लोकाभिमुखता आणि निर्णय घेण्याचे धैर्य या मूल्यांना आपल्या कार्याचा आधार बनवा. जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, यशदाच्या सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड, सहायक प्राध्यापक तथा संचालक, प्रांजली खडसे, सहायक प्राध्यापक शमा पवार उपस्थित होते.

 

राज्यपाल म्हणाले, प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या कायदे, नियम, कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि प्रशासनातील विविध पैलूंसोबत स्वतःचे चारित्र्य घडविणे महत्वाचे आहे. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध दबावांना सामोरे जाताना जनतेचा विश्वास संपादन करणे आणि टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.

 

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये दैनंदिन प्रशासनाचा भाग झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.वर्मा म्हणाले, प्रामाणिकपणाबाबत कोणतीही तडजोड करू नका. आर्थिक गैरव्यवहारासोबतच पक्षपात, अधिकारांचा गैरवापर, भेदभाव, हितसंबंधांचा संघर्ष आणि जाणीवपूर्वक होणारा विलंब यामुळेही प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात येते. प्रामाणिकपणा, दयाळू असणे, उपलब्धता, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि सहानुभूती हे गुणदेखील कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी तेवढेच आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.

 

जनतेमध्ये जाऊन काम करा, असा संदेश देवून राज्यपालांनी गाव, शाळा, आरोग्य केंद्रांना भेटी देऊन शेतकरी, कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.

 

तंत्रज्ञाना वापर आणि प्रशासनाचा मानवी चेहरा यावर भर देतांना राज्यपाल श्री.वर्मा म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रशासन अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करावे. प्रशासनाचा तंत्रज्ञानामुळे प्रशासन अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे. डिजीटल सुविधा नागरिकांसाठी सुविधाजनक ठराव्यात यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनांच्या पूर्ततेसाठी योग्य धोरणांसोबतच त्यांची अंमलबजावणी करणारे तत्पर प्रशासनही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक परिस्थितीत वैयक्तिक हितापेक्षा सांविधानिक मूल्यांना आणि नागरिकांशी न्याय्य वर्तनाला महत्व देण्याचे आवाहनही राज्यपाल श्री.वर्मा यांनी केले.

 

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे म्हणाले, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आधारित शासन, पर्यावरणीय आव्हाने आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे प्रशासनाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आजीवन शिकण्याची वृत्ती, नैतिक नेतृत्व आणि लोकसेवेची भावना विकसित करणे आवश्यक आहे. यशदा आता केवळ प्रशिक्षण संस्थेपुरती मर्यादित न राहता ‘लर्निंग फॅसिलिटेटर’ म्हणून काम करीत आहे. प्रशिक्षणासोबत संशोधन, सल्लागार सेवा, सहयोग आणि ज्ञान व्यवस्थापनाची सांगड घालण्यात आली आहे. यासाठी ३ आंतर-विभागीय प्रभाग आणि ८ उत्कृष्टता केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तंत्रज्ञान प्रशासनाला गती देऊ शकते; मात्र सहानुभूतीमुळे प्रशासनाला मानवी चेहरा मिळतो, असे त्यांनी सांगितले.

 

सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सक्षम, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी घडवणे हे यशदाचे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या.

 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते सीपीटीपीच्या संकेतस्थळाचे अनावरण आणि प्रशिक्षण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments