Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटरच्या २८ व्या कार्यशाळेत ६० हून अधिक भारतीय आणि ७...

इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटरच्या २८ व्या कार्यशाळेत ६० हून अधिक भारतीय आणि ७ स्वीडिश कंपन्यांचा सहभाग

पुणे, २८ ऑक्टोबर २०२६ : स्वच्छ तंत्रज्ञान आणि उद्योगांमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारत आणि स्वीडन यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ‘इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटर’ (आयएसआयए) या उपक्रमाची २८ वी कार्यशाळा आज पुण्यात आयोजित करण्यात आली. भारतात नाविन्यपूर्ण स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी, तंत्रज्ञान पुरवठादार आणि शाश्वत विकास क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

 

इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटर (आयएसआयए) हा भारत आणि स्वीडन यांच्यात स्वच्छ तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण द्विपक्षीय उपक्रम आहे. स्वीडिश एनर्जी एजन्सीच्या सहकार्याने आणि बिझनेस स्वीडन – द स्वीडिश ट्रेड अँड इन्व्हेस्ट कौन्सिल तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री – ग्रीन बिझनेस सेंटर (सीआयआय-जीबीसी) यांच्या भागीदारीत हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून स्वीडनमधील स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत केली जाते. त्याचबरोबर भारतीय उद्योगांना परिणामकारक ठरलेल्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळविणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

 

या कार्यशाळेत ६० हून अधिक भारतीय कंपन्या आणि स्वीडनमधील स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील ७ कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऊर्जा साठवणूक, संसाधनांचा कार्यक्षम वापर, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि डिजिटल उपाययोजना तसेच हरित प्रणोदन तंत्रज्ञानासह पर्यावरणपूरक वाहतूक अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

 

आयएसआयए या उपक्रमाने सुरुवातीपासूनच भारत आणि स्वीडन यांच्यातील स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ८० हून अधिक प्रगत स्वच्छ तंत्रज्ञानांची भारतीय बाजारपेठेत ओळख करून देण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमध्ये २५० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांना चालना मिळाली असून, ५० हून अधिक औद्योगिक भागीदाऱ्या घडवून आणण्यात आल्या आहेत. तसेच भारतातील १,५०० हून अधिक संबंधित घटक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

 

पुढील वर्षी इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटर या उपक्रमाला १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. नवीकरणीय ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देणे आणि दोन्ही देशांच्या निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीत योगदान देणे, या क्षेत्रांतील दीर्घकालीन सहकार्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आगामी काळात अधिकाधिक औद्योगिक भागीदाऱ्या निर्माण करणे, स्वीडिश कंपन्यांना भारतात आपले कार्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि भारताच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत अधिक प्रभावी योगदान देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

भारत आणि स्वीडन यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होत असताना हा महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक हे या भागीदारीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असून, स्वीडनचे स्वच्छ तंत्रज्ञानातील कौशल्य आणि भारताची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे व व्यापक औद्योगिक क्षमता यांचा संगम साधण्यावर भर दिला जात आहे. आयएसआयएच्या १५ व्या वर्षाकडे वाटचाल करताना या द्विपक्षीय सहकार्याचे रूपांतर नव्या व्यावसायिक भागीदाऱ्या, स्थानिक गुंतवणूक आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देणाऱ्या प्रत्यक्ष उपाययोजनांमध्ये करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

 

कार्यशाळेची सुरुवात इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे चॅप्टरच्या कोअर कमिटी सदस्य आणि सस्टेन अँड सेव्हच्या संचालिका प्रणती श्रॉफ मुनोत यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. उद्योगांच्या दैनंदिन कार्यपद्धतीत शाश्वत विकासाच्या तत्त्वांचा समावेश करणे, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसेच उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात हरित पद्धतींचा स्वीकार वाढविण्यासाठी विविध संस्थांमधील सहकार्य आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

स्वीडिश एनर्जी एजन्सीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विकास आणि गुंतवणूक विभागाचे वरिष्ठ व्यवसाय विकास अधिकारी निल्स हेनोख यांनी कार्यशाळेच्या विषयावर मार्गदर्शन केले. आयएसआयए आणि इंडस्ट्री ट्रान्झिशन पार्टनरशिप (आयटीपी) यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात भारत व स्वीडन यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ऊर्जा आणि पर्यावरण विकास क्षेत्रातील आपल्या व्यापक अनुभवाचा संदर्भ देत त्यांनी ऊर्जा संक्रमण प्रक्रियेत स्वीडनने बजावलेल्या अग्रणी भूमिकेवर प्रकाश टाकला. या क्षेत्रात दोन्ही देशांनी सातत्याने एकत्र काम करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बिझनेस स्वीडनचे व्यापार आयुक्त एरिक ओदार यांनी विशेष मार्गदर्शन करताना भारत आणि स्वीडन यांच्यातील व्यापार व गुंतवणूक विषयक भागीदारी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विशेषतः स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर त्यांनी भर दिला. भारताने २०७० पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते साध्य करण्यासाठी स्वीडनच्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील कौशल्याचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील सहकार्याला गती देणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन, स्थानिक पातळीवरील गुंतवणूक आणि मजबूत व्यावसायिक भागीदाऱ्या निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

समारोपाच्या भाषणात सीआयआय-ग्रीन बिझनेस सेंटरचे प्रिंसिपल काउन्सेलर दिनेश घई यांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी परिणामकारक ठरलेले तंत्रज्ञान आणि उद्योगांमधील मजबूत भागीदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यशाळेतील चर्चेच्या आधारे सहभागी कंपन्यांनी परस्पर सहकार्याच्या ठोस संधी शोधाव्यात, जेणेकरून स्वच्छ तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढेल आणि हरित अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती मिळेल, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यशाळेत सी-ग्रीन, ड्रुप्स, ईकॅप्स, इलॉनरोड, एन्क्लिमा सोल्युशन्स, होलीव्होल्ट आणि पाइपगार्ड या स्वीडिश कंपन्यांनी तांत्रिक सादरीकरणे केली. भारतातील उद्योगांच्या गरजा आणि ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या नाविन्यपूर्ण स्वच्छ तंत्रज्ञानाची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर, व्यावसायिक भागीदाऱ्या आणि संयुक्त उपक्रमांच्या संधींबाबत संवादात्मक सत्रे व चर्चा आयोजित करण्यात आल्या.

 

या कार्यशाळेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बीटूबी बैठका. या बैठकांमुळे स्वीडिश तंत्रज्ञान पुरवठादार आणि भारतीय उद्योग प्रतिनिधींना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रायोगिक प्रकल्प, व्यावसायिक भागीदाऱ्या आणि दीर्घकालीन सहकार्याच्या विविध शक्यतांवर यावेळी चर्चा झाली.

 

याच कार्यशाळेत ईकॅप्स आणि पाइपगार्ड या दोन कंपन्यांनी इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटर (आयएसआयए) कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा करण्यात आली. भारतीय बाजारपेठेतील संधींचा शोध घेणे आणि येथे आपले व्यावसायिक अस्तित्व निर्माण करण्याच्या दिशेने या कंपन्यांनी केलेल्या प्रगतीची यानिमित्ताने दखल घेण्यात आली.

 

स्वीडनमधील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि भारतातील औद्योगिक क्षेत्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून आयएसआयएची भूमिका अधिक बळकट होत आहे. शाश्वत आर्थिक विकास, उद्योगांमधील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या भविष्याची निर्मिती या समान उद्दिष्टांसाठी भारत आणि स्वीडन यांची कटिबद्धता या उपक्रमातून

अधोरेखित होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments