पुणे : श्रद्धेला धर्माच्या सीमा नसतात, याचा सुंदर प्रत्यय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीच्या उत्सवात येत आहे. गणरायाच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित विशेष अलंकार गणेशभक्त समर शेख संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. उत्सवाच्या १३४ वर्षांच्या इतिहासात ‘एकदंत’ या रूपाला विशेष समर्पित असा अलंकार प्रथमच साकारण्यात आला आहे.
अल रझा जेम्स अँड ज्वेल्सचे प्रोप्रायटर समर शेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अलंकाराचे नामकरण ‘सिम्बॉल ऑफ ऑनर’ असे करण्यात आले आहे. गणरायाच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित हा अलंकार एकतेचे प्रतीक म्हणून साकारण्यात आला आहे. बाप्पाच्या मूर्तीतील ‘एकदंत’ या वैशिष्ट्याला विशेष समर्पित असा अलंकार असावा, ही संकल्पना समर शेख यांच्या मनात आली. त्यातून या अनोख्या दागिन्याची निर्मिती करण्यात आली.
समर शेख म्हणाले, अलंकार साकारण्यासाठी पाच कारागिरांनी दोन महिने मेहनत घेतली. त्यामध्ये एकूण ९.६९ कॅरेट हिऱ्यांचा वापर करण्यात आला असून, तब्बल ५५ हिरे त्यात जडविण्यात आले आहेत. या दागिन्याची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.
बाप्पाची सेवा करण्याची आणि त्यांच्या ‘एकदंत’ रूपाला समर्पित अलंकार साकारण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. बाप्पानेच आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली, अशी भावना समर शेख यांनी व्यक्त केली. अल रझा जेम्स अँड ज्वेल्सचे प्रोप्रायटर समर शेख आणि शेख कुटुंबीयांच्या वतीने हा अलंकार साकारण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना अधोरेखित करणारा हा अलंकार गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.


