पुणे, दि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे करण्यात आला.
अभियानाच्या शुभारंभानिमित्त प्रकल्प कार्यालयापासून पंचायत समिती चौकमार्गे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेपर्यंत ‘सेवा यात्रा’ स्वरूपात प्रभात फेरी काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा आणि योजनांची माहिती देणारे फलक यामुळे जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. या फेरीत ५०० हून अधिक आदिवासी बांधव, महिला बचत गटांच्या सदस्या, विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.
यानंतर आयोजित आदिवासी मेळाव्यात वनहक्क कायदा, शबरी महामंडळाच्या स्वयंरोजगार योजना, राणी दुर्गावती महिला बचत गट सबलीकरण, न्यूक्लियस बजेट व डीबीटी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी १२ पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पेसा दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, पंचायत समिती आंबेगावच्या उपसभापती ज्योती पारधी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सुकाळवेडे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्या जनाबाई उगले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट, संदीप पाटील व रवींद्र माळवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
*आदिवासी पाडे-वस्त्यांपर्यंत विशेष प्रचार मोहीम*
अभियानांतर्गत दुर्गम भागातील आदिवासी पाडे व वस्त्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी ध्वनिक्षेपकासह विशेष प्रचार रथ फिरविण्यात येत आहे. वनहक्क, शबरी महामंडळ, राणी दुर्गावती महिला बचत गट, डीबीटी व न्यूक्लियस बजेट आदी योजनांची माहिती देणारी पत्रकेही वितरित करण्यात येत आहेत. अभियानाच्या पुढील कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून जनजागृती, मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


