Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑर्थो-प्लास्टिक उपचार दृष्टिकोनामुळे अपघातग्रस्त 60 वर्षीय रुग्णाची प्रकृती पूर्ववत

ऑर्थो-प्लास्टिक उपचार दृष्टिकोनामुळे अपघातग्रस्त 60 वर्षीय रुग्णाची प्रकृती पूर्ववत

 

 

पुणे, 8 ऑक्टोबर 2026 : भीषण अपघातात गंभीर दुखापत झालेल्या 60 वर्षीय रुग्णाचा पाय वाचवण्यात नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांना यश आले आहे. या उपचार प्रक्रियेचे नेतृत्व प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. स्वामिनाथन रवी यांनी केले.

 

शिक्रापूर रस्त्यावर हा रुग्ण दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने पायाचे हाड मोडणे (कंपाऊंड फ्रॅक्चर), रक्तवाहिन्यांना दुखापत तसेच त्वचा, स्नायू आणि इतर मऊ ऊतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

 

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. स्वामिनाथन रवी म्हणाले की, आम्ही ऑर्थो-प्लास्टिक उपचारपद्धतीचा अवलंब केला असून या उपचारांमध्ये दोन टप्प्यांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात जखमेतील खराब झालेल्या आणि दूषित ऊती काढून टाकण्याची प्रक्रिया करण्यात आली. तसेच संसर्गाचा धोका वाढवू शकणारे,सैल झालेले हाडांचे छोटे कण शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले.या प्रक्रियेला थरो डेब्रीडमेंट असे म्हणतात. त्यानंतर बाह्य उपकरणाच्या (एक्सटर्नल फिक्सेटर) साहाय्याने फ्रॅक्चर स्थिर करण्यात आले. या प्रकियेत हाडामध्ये पिन बसवून त्या शरीराच्या बाहेर असलेल्या एका विशेष फ्रेमला जोडण्यात आले. त्यामुळे हाड योग्य स्थितीत ठेवता येते आणि डॉक्टरांना त्याच वेळी जखमेपर्यंत पोहचणे शक्य होते. यानंतर व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर (व्हीएसी) थेरपी किंवा निगेटिव्ह प्रेशर वाऊंड थेरपी (एनपीडब्ल्यूटी) ही प्रक्रिया करण्यात आली. या उपचार पद्धतीत नियंत्रित सक्शन यंत्रणेद्वारे विशेष फोम ड्रेसिंग करण्यात आले. यामुळे जखमेतील अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास, निरोगी ऊतींची वाढ होण्यास आणि जखम भरून येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

 

दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रिया 72 तासांच्या आत करण्यात आली. या प्रक्रियेला मायक्रोव्हॅस्क्युलर फ्री फ्लॅप असे म्हणतात. मायक्रोव्हॅस्क्युलर फ्री फ्लॅप ही मोठ्या आणि गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये पुनर्रचना करण्यासाठी वापरली जाणारी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या शरीराच्या एका भागातून त्वचा, स्नायू, चरबी किंवा हाडांसह आवश्यक निरोगी ऊती काढून दुखापत झालेल्या भागात रोपित केल्या जातात.

 

शस्त्रक्रियेसाठी मायक्रोस्कोपच्या मदतीने या ऊतींमधील लहान रक्तवाहिन्या जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या जातात. त्यामुळे रोपित केलेल्या ऊतींना रक्तपुरवठा सुरू राहतो आणि त्या जिवंत राहण्यास मदत होते. या रुग्णाच्या उजव्या मांडीमधून सुमारे 30 बाय 18 सेंटीमीटर आकाराच्या ऊतींचा भाग घेऊन डाव्या पायावर त्यांचे रोपण करण्यात आले.

 

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरच्या ट्रॉमा अँड स्पाइन विभागाचे प्रमुख डॉ. विशाल चौधरी म्हणाले की, ही प्रक्रिया अशा गंभीर परिस्थितीत उपयुक्त ठरते.फ्री फ्लॅप शस्त्रक्रियेमुळे अशा भागावर निरोगी रक्तपुरवठा असलेल्या ऊतींचे आवरण तयार करता येते. त्यामुळे मोठ्या जखमा भरून येण्यास मदत होते, तसेच सततचा संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यास आणि दुखापत झालेला अवयव वाचवण्यास मदत होते.

 

डॉ. चौधरी पुढे म्हणाले की, सुमारे चार आठवड्यांत जखम भरून आल्यानंतर बाह्य फिक्सेटर काढून त्याऐवजी प्लेट आणि स्क्रूच्या साहाय्याने अंतर्गत फिक्सेशन करण्यात आले. या पद्धतीत हाडांच्या तुकड्यांना योग्य स्थितीत कायम ठेवण्यासाठी विशेष आकाराची धातूची प्लेट हाडावर बसवून स्क्रूच्या मदतीने घट्ट केली जाते.

 

सहा आठवड्यांनंतर रुग्णाने पायावर अंशतः वजन देऊन चालण्यास सुरुवात केली आहे. सध्या ते फिजिओथेरपी टीमच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन उपचार घेत आहेत.

डॉ. स्वामिनाथन म्हणाले की, भारतातील ट्रॉमा उपचारांमध्ये ऑर्थो-प्लास्टिक उपचार पद्धतीचा वापर वाढत आहे. या पद्धतीत हाडांच्या दुखापती सोबत मऊ ऊतींच्या दुखापतीवरही उपचार करणे शक्य होते. यासाठी आर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जन हे उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर समन्वय साधून काम करतात. तसेच भूलतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, संसर्ग नियंत्रण तज्ज्ञ आणि गरजेनुसार इतर वैद्यकीय तज्ज्ञांचीही मदत घेतली जाते.

 

फ्रॅक्चर स्थिर करणे आणि योग्य वेळी मऊ ऊतींची पुनर्रचना करणे यांचा समन्वय साधल्यामुळे जखम लवकर भरून येणे, गुंतागुंत कमी करणे आणि रुग्णाच्या पुनर्प्राप्तीस मदत होऊ शकते. मायक्रोव्हॅस्क्युलर पुनर्रचना आवश्यक असलेल्या गंभीर दुखापतींमध्ये वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे असते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया शक्यतो अपघातानंतर 72 तासांच्या आत करणे अपेक्षित असते. त्यामुळे रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञांकडे घेऊन जाणे आणि आवश्यक शस्त्रक्रिया कौशल्य व बहुवैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध असलेल्या टर्शरी केअर सेंटरमध्ये वेळेत दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

या उपचारांच्या टीममध्ये डॉ. स्वामिनाथन रवी यांच्यासह ट्रॉमा अँड स्पाइन विभागाचे प्रमुख डॉ.विशाल चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संगीता चंद्रशेखर, प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज पवार, आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ.प्रथमेश राऊत आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले की, गंभीर अपघातानंतर रुग्णाचा अवयव वाचवण्यासाठी वेळेवर उपचार, शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि विविध वैद्यकीय शाखांमधील प्रभावी समन्वय अत्यंत आवश्यक असतो. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत ऑर्थो-प्लास्टिक उपचार पद्धतीचा अवलंब करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमच्या ऑर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जरी टीमचे मी अभिनंदन करतो. नोबल हॉस्पिटल्समध्ये रूग्ण लवकर बरा होणे व सुरक्षितपणे प्रकृती सुधारण्यास प्राधान्य दिले जाते. उपचारांमधील उद्भवणाऱ्या गुंतागुंती कमी करणे आणि त्यांना शक्य तितक्या लवकर शारीरिक कार्यक्षमता पुन्हा मिळवून देण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या कामावर आणि दैनंदिन जीवनात लवकर परतता येते. गंभीर दुखापतींच्या उपचारांमध्ये विविध वैद्यकीय शाखांनी एकत्रितपणे काम केल्यास रुग्णाच्या उपचार प्रक्रियेत आणि पुनर्वसनात सकारात्मक सुधारणा घडवून आणता येते, याचे

हे उत्तम उदाहरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments