• ‘मानुषेर माझे माँ’ या संकल्पनेवर आधारित दुर्गापूजा मंडपाची सजावट
पुणे, १० ऑक्टोबर २०२६ : आधुनिक संकल्पना आणि पारंपरिकता यांचा अनोखा मिलाफ साधत विविध भारतीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजातील नागरिकांना एकत्र आणणार्या सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शारदीय दुर्गापूजा २०२६ महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे १६ ते २१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संपन्न होणार आहे. यंदा संस्थेच्या सामुदायिक दुर्गापूजा उत्सवाचे पाचवे वर्ष असून, या विशेष टप्प्याचे औचित्य साधून ‘मानुषेर माझे माँ’ अर्थात ‘माणसांमध्ये आई’ ही भावस्पर्शी संकल्पना निवडली आहे.या पाच दिवसीय अभिनव महोत्सवात दैनंदिन दुर्गा पूजा विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवल तसेच समुदायातील एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवी आनंदाचा पुन्हा एकदा अनुभव घेता येणार आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास , उपाध्यक्ष जॉयदीप चॅटर्जी , सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू आणि खजिनदार राज भनोट यांनी दिली.
या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास म्हणाले की, यंदाच्या दुर्गापूजेची संकल्पना ‘मानुषेर माझे माँ’ अर्थात ‘माणसांमध्ये आई’अशी आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्येच देवीचे अस्तित्व अनुभवण्याचा संदेश या संकल्पनेतून दिला आहे. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी झटणाऱ्या माणसांच्या श्रमांत, समर्पणात आणि माणुसकीतही देवीचे दर्शन घडते, ही या संकल्पनेमागील भावना आहे.यंदाची संकल्पना केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नसून मानवता आणि कृतज्ञतेचा संदेश देणारी आहे. या पूजेच्या माध्यमातून उत्सव यशस्वी करण्यासाठी मूर्तिकार, मंडप उभारणारे कारागीर, ढाक वाद्य वाजवणारे कलाकार, रोषणाई करणारे तंत्रज्ञ, फुलविक्रेते, सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी हे सर्वजण रात्रंदिवस मेहनत करून इतरांचा सण आनंददायी बनवतात. अनेकदा आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते समाजाच्या आनंदासाठी कार्यरत असतात. पडद्यामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या, मात्र अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे.
सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू म्हणाले की, इको फ्रेंडली दुर्गा मातेची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. यंदा देवीची मूर्ती सौंदर्य, साधेपणा,अत्यंत देखण्या आणि सात्विक रूपात विराजमान होणार आहे.आमची मूर्ती म्हणजे मानवतेला वाहिलेली विनम्र आदरांजली असून देवीचे रूप शांत, प्रसन्न आणि एखाद्या मायाळू आईसारखे असणार आहे. देवीच्या डोळ्यांत शांतता आणि हास्यात क्षमाशीलतेची भावना अनुभवता येणार असून तिचं हेच मानवी रूप तिला खऱ्या अर्थाने ‘दिव्य’ असणार आहे. यंदा देवीच्या मूर्तीला स्थानिक कारागिरांनी अनेक महिने मेहनत घेऊन हाताने साकारलेल्या अद्वितीय दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. प्रत्येक मणी, प्रत्येक धागा मानवी हातांचा स्पर्श, श्रद्धा आणि कलाकौशल्याची एक वेगळी कहाणी सांगणारा आहे.
खजिनदार राज भनोट म्हणाले की, आपल्या पाचव्या वर्षाच्या उत्सवातून कृतज्ञता, प्रत्येक व्यक्तीच्या श्रमांचा सन्मान आणि सामूहिक एकतेचा संदेश देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. पाच दिवस चालणारा हा महोत्सव सांस्कृतिक परंपरेचे जतन, एकात्मतेची भावना, भक्तिभाव आणि सांस्कृतिक अभिमान यांचा गौरव करणारा आहे. एकूण पाच दिवस चालणाऱ्या या दुर्गा पूजा महोत्सवात विविध रंगी भक्ती संगीत व नृत्य, कलाकारांचा नयन मनोहर अविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद, विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन, फूड कोर्ट आणि विविध संस्थांतर्फे अनेक प्रकारचे उपक्रम अशी खास आकर्षणे असणार आहेत.आम्ही यात सहभागी होणारे सदस्य, हितचिंतक व समाजातील लक्षावधी भाविक यांचे असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. संपूर्ण वातानुकूलित संकुल, व्हॅले पार्किंग, मोफत आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी व्हील चेअर सुविधा, 24 तास वैद्यकीय सहाय्यक यांची उपस्थिती यातून सप्तपदी असोसिएशनने हा दुर्गा पूजा महोत्सव सर्व सहभागी भाविकांसाठी कोणत्याही अडथळ्याविना व आनंददायकरित्या पार पाडेल अशी काळजी घेतली आहे. दररोज सकाळी विधीवत दुर्गा पुजा होणार असून त्यापाठोपाठ पुष्पांजली अन्य पारंपरिक पुजा विधी यांचा समावेश असणार आहे.या व्यतिरिक्त सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद मेळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव वेळापत्रक
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी महाषष्ठीच्या दिवशी सकाळी ८ वाजता देवीच्या कल्पारंभ पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘आनंद मेळा’ आयोजित करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता बोरॉन विधी, षष्ठी पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल.शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी महासप्तमीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नवपत्रिका प्रवेश, १० वाजता सप्तमी पूजा, ११ वाजता पुष्पांजली आणि दुपारी १२ वाजता देवीच्या महाप्रसादाचे वाटप होईल. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी महाष्टमीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता अष्टमी पूजा, ११.३० वाजता पुष्पांजली आणि दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. भाविकांसाठी चार दिवस विशेष सात्त्विक महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप होईल.सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सकाळी ७.२० वाजता संधीपूजा, ७.५० वाजता बलिदान व दीपदान, १०.३० वाजता नवमी पूजा आणि ११.३० वाजता पुष्पांजली आयोजित करण्यात येईल. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दशमीपूर्व पूजेअंतर्गत सकाळी ८.३० वाजता कुमारी पूजा आणि ९ वाजता कुमारी भोग अर्पण करण्यात येईल. याशिवाय, उत्सवाच्या प्रत्येक सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यामुळे भाविकांना धार्मिक वातावरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेता येईल.


