पुणे : वादक, झीलकरी, निवेदक अशा माध्यमातून शाहिरी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांना ४४ वर्षांच्या कलाप्रवासात साथ देणाऱ्या साठ कलासाधकांचा सन्मान करण्यात आला. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व शाहीर मावळे शिष्य परिवारातर्फे कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी कार्यालयात कलासाधकांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पी पी ग्रुप मधील सदस्यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाला ऍड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, पराग ठाकूर, उदय जगताप, कुमार रेणुसे, पियुष शहा, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.
ऍड. प्रताप परदेशी म्हणाले, शाहीर मावळे यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. प्रबोधिनीतर्फे त्यांनी अनेक उपक्रम सातत्याने राबविले. यामाध्यमातून नवीन पिढीला चांगले विचार देण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते म्हणाले, खिशात पैसे किती आहेत, त्यापेक्षा सामाजिक उपक्रम व ध्येयपूर्ती याकडे शाहिरांनी कायम लक्ष दिले.
पराग ठाकूर म्हणाले, शाहिरी ही एक विलक्षण लोककला आहे. तरुण शाहिरांचे चैतन्य फुलविणारे शाहीर हेमंतराजे मावळे हे व्यक्तिमत्व आहे. पराक्रमाचे पोवाडे गाण्याची कला म्हणजे शाहिरी. शाहीर मावळे यांनी केवळ पुरुष साधकांना नाही, तर स्त्रियांना देखील पोवाडे गायनाची कला शिकविली, असेही त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शाहीर मावळे यांच्यासोबत काम करताना कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक अनुभव सांगितले.


