पुणे/पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) दिनांक २८ ऑक्टोबर २०२६:- जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन अडीच वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले होते. त्याला त्यांनी दुजेरा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएला कॉलवर संपर्क साधला होता आणि पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत या विषयावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून त्यांनी दोन दिवसात त्यांची भूमिका यावर जाहीर केली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष भरतभाऊ ओव्हाळ यांनी दिला आहे.
प्रसिद्धी माध्यमां सोबत बोलतांना ओव्हाळ यांनी म्हटले आहे की,जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना निवेदन दिले होते. त्यांनी या विषयावर आश्वासन दिले होते;जरांगे पाटील हे विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आंदोलनासाठी पुढाकार घेतात. जुन्नर आणि भीमाशंकर येथे जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. विविध विषयांवर आंदोलन करण्यासाठीही ते पुढे येतात. मात्र, जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष का केले जात आहे. पुतळा उभारू नये म्हणून मुस्लिम समाजाकडून पैसे घेतले आहेत का? नाही हे माध्यमांसमोर सांगावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा विषय चांगला असून तो हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.जर हा विषय महत्त्वाचा वाटत नसेल तर तसे त्यांनी जाहीर करावे.मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी जात असताना शिवभीम सेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांच्या आंदोलनाला चांगल्या कामासाठी पाठिंबा दिला असताना, जंजिरा किल्ल्यावरील पुतळ्याच्या मागणीच्या बाबतीत आमच्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे.या विषयावर जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करावी आणि समाजाची दिशाभूल करू नये अन्यथा अंतरवाली सराटी येथे येऊन तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही.
ते मराठा समाजाची दिशाभूल करत असून त्यांच्या भूमिकेवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही.कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत असून कोणाच्या प्रभावाखाली काम करतात, त्यांचे मार्गदर्शक कोण आहेत? हे बघणे गरजेचे आहे. ते रोबोटसारखे काम करत असून कुणीतरी सांगितल्यावर ते चालतात आणि कुणीतरी सांगितल्यावर थांबतात. त्यांच्यासोबत असणारे सहकारी हे टेंडर धार्जिणे असून जरांगे हे त्यांचे प्रमुख आहेत.दोन दिवसांत उत्तर न दिल्यास अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांना काळे फासण्याचा इशारा देत “ही धमकी समजायची की इशारा, हे मनोज जरांगे पाटील यांनी ठरवावे, असेही ओव्हाळ यांनी म्हटले आहे.
(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या OHD यांच्या सोबत मनोज जरांगे संवाद साधत असल्याचा जुना व्हिडीओ सोबत जोडला आहे)


