पुणे, ऑक्टोबर २०२६ : डॉ. डी. वाय. पाटील समूहाच्या ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (डीपीजीयू) येथील स्कूल फॉर हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझमच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष पेस्ट्री कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमधील शेफ सुमंत शर्मा यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमेरिकेतील ह्युस्टन येथील मुसाफिर रेस्टॉरंटचे एक्झिक्युटिव्ह पेस्ट्री शेफ असलेल्या शर्मा यांनी पारंपरिक भारतीय मिठाईंना आधुनिक स्वरूप देण्याच्या विविध संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
‘अ सेलिब्रेशन ऑफ लाईट, क्राफ्ट अँड कंटेम्पररी इंडियन कन्फेक्शनरी’ या संकल्पनेवर आधारित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिवाळीतील पारंपरिक घटक, आधुनिक पेस्ट्री तंत्र आणि आकर्षक सादरीकरण यांचा मेळ घालण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेच्या सुरुवातीला शेफ सुमंत शर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या परिसराची पाहणी केली. दिवाळीतील पणत्या, रांगोळी, फटाके तसेच अन्य सजावटीच्या घटकांचा वापर करून डेझर्टला आकर्षक आणि उत्सवी रूप कसे देता येते, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दिले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तीन विशेष डेझर्ट तयार केले. यामध्ये बदाम साब्ले, बदाम बर्फी लेस, पेकन हलवा आणि सी बकथॉर्न-रास्पबेरी जेलपासून तयार केलेला ‘एडिबल दिया’, पिस्ता बर्फी, चॉकलेट आणि गोल्डन सॉईलपासून साकारलेला ‘एडिबल पटाखा’ तसेच बदाम टार्ट, पिस्ता क्रम्बल, व्हाइट चॉकलेट गनाश आणि मिल्क केकपासून तयार केलेला ‘रांगोली मिल्क केक टार्ट’ यांचा समावेश होता.
यावेळी डॉ. सोम नाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणाले, “विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शिकण्याची संधी देणे हा आमचा प्रयत्न आहे. शेफ सुमंत शर्मा यांनी भारतीय चवी आणि परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्या आहेत. त्यांच्या भेटीतून विद्यार्थ्यांना कौशल्य, शिस्त आणि नावीन्यपूर्ण विचारांची प्रेरणा मिळाली.”
डीपीजीयूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिणी एस. पाटील म्हणाल्या, “हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा अनुभवी शेफसोबत प्रत्यक्ष काम केल्याने विद्यार्थ्यांच्या कौशल्यांसोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. उद्योगाच्या गरजांशी विद्यार्थ्यांना जोडणाऱ्या अशा संधी यापुढेही उपलब्ध करून देण्यात येतील.”
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शेफ शर्मा यांच्याशी संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या सत्रातून त्यांनी पेस्ट्री तंत्र, चवींचा समतोल, डेझर्टची मांडणी आणि आधुनिक सादरीकरण याबाबत मार्गदर्शन घेतले. पारंपरिक भारतीय सण आणि आधुनिक पाककलेचा सुंदर संगम साधत या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या खाद्यपरंपरेचा नवा अनुभव मिळाला.


