पुणे, दि. ५ : वाघोली गावठाणातील अरुंद रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोहगाव चौकातून गावठाणामार्गे अहिल्यानगर रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे.
या मार्गावर आव्हाळवाडी किंवा इतर मार्गावरून येऊन गावठाणातील रस्त्याने लोहगाव चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग म्हणून आव्हाळवाडी किंवा अहिल्यानगरकडून लोहगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वाघेश्वर चौकातून उजवीकडे वळण घेऊन लोहगाव चौकामार्गे इच्छित स्थळी जावे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून वाहतूक पोलीस कर्मचारी व स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.


