Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञान सेतू उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या...

ज्ञान सेतू उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या शैक्षणिक दौऱ्यावर*

 

*‘माझे गाव ते माझा देश’ उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश*

 

पुणे, दि. १७ (जिमाका, वृत्तसेवा) : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक जाणिवा आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने ‘माझे गाव ते माझा देश’ या संकल्पनेतून ज्ञान सेतू विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत परीक्षेद्वारे निवड झालेले पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५१ गुणवंत विद्यार्थी आणि ९ शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी आज १७ नोव्हेंबर रोजी रेल्वेने रवाना झाले. हे विद्यार्थी २० नोव्हेंबर रोजी पुण्यात परतणार आहेत.

 

देशातील भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि ‘विविधतेत एकता’ या राष्ट्रीय मूल्याची जाणीव निर्माण करणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

 

या दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांचे नऊ गट करण्यात आले असून प्रत्येक गटासाठी यजमान शाळा निश्चित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील भद्रवाह आणि पुंछ, आसाममधील दिराक, काकीपठार आणि डिब्रूगड, तसेच अरुणाचल प्रदेशातील रोइंग आणि तेजू येथील शाळांमध्ये विद्यार्थी शैक्षणिक सहअध्ययनात सहभागी होणार आहेत.

 

प्रवासापूर्वी विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय पूर्वतयारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता, संवाद कौशल्ये, प्रादेशिक माहिती आणि शैक्षणिक दौऱ्यातील अपेक्षित अनुभव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दौऱ्यादरम्यान विद्यार्थी यजमान शाळांमधील वर्ग, सहशालेय उपक्रम आणि स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद यात सहभागी होतील. तसेच संबंधित प्रदेशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि जीवनशैलीचा परिचय करून देणारा अभ्यासदौराही आयोजित करण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांनाही पुणे जिल्ह्याच्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. या भेटीत त्यांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, परस्पर समज आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.

 

ज्ञान प्रबोधिनी, पुणे ही या उपक्रमाची अंमलबजावणी भागीदार संस्था असून, कार्यक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांचे पूर्वतयारी मार्गदर्शन आणि यजमान शाळांशी समन्वय साधण्याची जबाबदारी संस्थेकडे आहे.

 

*ग्रामीण विद्यार्थ्यांचे विचारविश्व व्यापक होणार : विरधवल जगदाळे*

 

शिक्षण केवळ पाठ्यपुस्तके आणि वर्गखोलीपुरते मर्यादित नसते. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना देशाची विविधता अनुभवता येईल, विविध संस्कृती समजून घेता येतील आणि अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांशी मैत्री निर्माण करता येईल. हा अनुभव विद्यार्थ्यांचे विचारविश्व व्यापक करून त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी सांगितले.

 

भारताची खरी ताकद विविधतेत असून, विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद आणि तेथील परंपरांचा अनुभव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व देशाप्रती आपलेपणाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

 

जिल्हा परिषदेचा ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम ग्रामीण शिक्षणाला गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. ज्ञान सेतू उपक्रमातून शिक्षण वर्गखोलीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा, नेतृत्वगुण आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

 

राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सुरक्षितता ही प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाची मूल्ये आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचे कार्य सुरू आहे. आता पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचत आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या प्रतिज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार असल्याचे ज्ञान प्रबोधिनीचे विभागप्रमुख अमर परांजपे यांनी सांगितले.

 

‘माझे गाव ते माझा देश’ या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना देशाच्या विविधतेची ओळख करून देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा, सामाजिक संवेदनशीलता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करण्याचा जिल्हा परिषद, पुणे यांचा प्रयत्न आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments