Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार* *जिल्ह्यातील ५...

दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार* *जिल्ह्यातील ५ हजार ७९५ शेतकऱ्यांना ६५.११ कोटींचे अनुदान; आधार संलग्न बँक खात्यांवर रक्कम जमा*

 

 

पुणे, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमतरता आणि उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षम वापर या पार्श्वभूमीवर कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे. शेतीची कामे कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी खर्चात करण्यासाठी कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ५ हजार ७९५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६५ कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे.

 

दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांचे व्यवस्थापन, मशागत, पेरणी, फवारणी आणि काढणीची कामे वेळेत पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. अशा वेळी आधुनिक कृषी यंत्रांचा वापर उपयुक्त ठरत असून, कृषी यांत्रिकीकरणामुळे श्रम, वेळ आणि उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८८९ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ३६४ शेतकऱ्यांना पॉवर टिलर, २ हजार ९०२ शेतकऱ्यांना कृषी यंत्र-अवजारे, ६०० शेतकऱ्यांना कृषी अवजारे बँक, १३ शेतकऱ्यांना किसान ड्रोन, तर २७ शेतकऱ्यांना कंबाईन हार्वेस्टरसाठी अनुदान देण्यात आले आहे.

 

**मशागतीपासून काढणीपर्यंत यंत्रांचा उपयोग**

ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या वापरामुळे शेतीची विविध कामे सुलभ होण्यासोबतच मजुरीवरील खर्च कमी होण्यास मदत होत आहे. पॉवर टिलरचा वापर उसाची बांधणी, फळबागांमध्ये भर लावणे, तणनियंत्रण आणि मशागतीसाठी केला जातो. तसेच ट्रॅक्टरचलित कल्टिव्हेटर, नांगर, ब्लोअर, ट्रॉली, चाफ कटर, ऊस पाचट व्यवस्थापन यंत्र, बेलर मशीन, शुगरकेन श्रेडर-कटर, पेंडी थ्रेशर, फवारणी आणि पेरणी यंत्रांसाठीही अनुदान दिले जाते.

 

**६०० कृषी अवजारे बँकांना २४ कोटींचे अनुदान**

कृषी अवजारे बँक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० ते २५ लाख रुपयांपर्यंतची ट्रॅक्टर व कृषी अवजारे खरेदी करता येतात. यासाठी ४ ते १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. चालू वर्षात जिल्ह्यातील ६०० कृषी अवजारे बँकांना एकूण २४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आधुनिक कृषी यंत्रांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध होत आहे.

 

**किसान ड्रोनद्वारे फवारणीला प्रोत्साहन**

किसान ड्रोन योजनेंतर्गत १३ शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ५७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून ऊस, अन्य पिके आणि फळबागांवर फवारणी करता येते. दुष्काळी परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी युरिया व पोटॅशची फवारणी करण्यासाठीही ड्रोनचा उपयोग होतो. कंबाईन हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू, हरभरा, सोयाबीन, मका आदी पिकांची काढणी कमी वेळेत करता येते.

 

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक कृषी यंत्रसामग्री महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments