Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorized*निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याचा नवा विचार; पुण्यात साकारले ‘निसर्गग्राम’!*

*निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याचा नवा विचार; पुण्यात साकारले ‘निसर्गग्राम’!*

 

 

पुण्यातील ताडीवाला रोडवर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेचे जुने केंद्र आहे. एकेकाळी तिथे उपचार घेतले आणि तेव्हापासून निसर्गोपचाराविषयी माझ्या मनात विशेष आस्था निर्माण झाली. कधी तरी उरुळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रात पंधरा दिवस राहून उपचार घ्यावेत, असेही वाटायचे. मात्र वेळेच्या गणितात ते कधी जमले नाही. अनेक परिचितांना या केंद्राची माहिती देऊन तिथे उपचारासाठी पाठविलेही आहे.

 

त्यामुळेच २०२४ मध्ये येवलेवाडी येथे सुरू झालेल्या ‘निसर्गग्राम’ला भेट देण्याची उत्सुकता होती. नुकताच तिथे जाण्याचा योग आला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने २५ एकर परिसरात उभारलेला हा प्रकल्प पाहिला आणि त्याविषयी लिहावे, असे ठरविले. त्यातून हा लेखप्रपंच!

 

आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे. शरीर आणि मनाचे संतुलन, योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि निसर्गाशी जोडलेले जीवन यांचाही त्यात समावेश होतो. आज बदलती जीवनशैली, वाढता ताण, व्यायामाचा अभाव आणि मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे वाढते प्रमाण पाहता आरोग्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. पुण्यातील येवलेवाडीचे ‘निसर्गग्राम’ याच विचाराला संस्थात्मक स्वरूप देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.

 

*गांधीजींच्या विचारांचा वारसा*

निसर्गग्रामची संकल्पना समजून घेताना महात्मा गांधी यांच्या निसर्गोपचारविषयक विचारांचा उल्लेख अपरिहार्य आहे. साधा आहार, स्वच्छता, श्रम, व्यायाम, संयम आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली यांना गांधीजी आरोग्याचा आधार मानत. पुण्याजवळील उरुळी कांचन येथे १९४६ मध्ये त्यांनी निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे, हा त्यांचा आग्रह होता.

 

याच विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेची स्थापना १९४५ मध्ये पुण्यात ‘ऑल इंडिया नेचर क्युअर फाउंडेशन’च्या माध्यमातून झाली. १७ मार्च १९७५ रोजी हे केंद्र भारत सरकारकडे हस्तांतरित झाले. पुढे २२ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थानाची स्थापना झाली. पुण्यातील बापू भवन हे या संस्थेचे मूळ केंद्र आहे. आज केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था म्हणून ती कार्यरत आहे.

 

प्राकृतिक चिकित्सा आणि योगशास्त्रातील ज्ञानाचा प्रसार, शिक्षण-प्रशिक्षण, संशोधन आणि या उपचारपद्धतींचे शास्त्रीय मूल्यमापन ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

 

*२५ एकरांत उभे राहिले आरोग्याचे नवे केंद्र*

काळानुसार आरोग्यविषयक गरजा बदलल्या. जीवनशैलीशी संबंधित आजार वाढू लागले. त्यामुळे निसर्गोपचाराला आधुनिक संशोधन, शिक्षण आणि व्यापक आरोग्यसेवेची जोड देण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच येवलेवाडी येथे ‘निसर्गग्राम’ उभारण्याची संकल्पना पुढे आली.

 

या प्रकल्पाचे भूमिपूजन १० मार्च २०१९ रोजी तत्कालीन केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. सुमारे २१३ कोटी ५५ लाख रुपये खर्चून २५ एकर क्षेत्रात हा परिसर विकसित करण्यात आला. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संस्थेचे आभासी पद्धतीने राष्ट्रार्पण करण्यात आले.

 

विशेष म्हणजे, येथे केवळ रुग्णालय उभारण्यापुरता विचार मर्यादित ठेवलेला नाही. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृती या सर्वांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे.

 

*२५० खाटांचे प्राकृतिक चिकित्सा रुग्णालय*

निसर्गग्राममधील प्रमुख आकर्षण म्हणजे २५० खाटांचे प्राकृतिक चिकित्सा रुग्णालय. राष्ट्रीय स्तरावरील या रुग्णालयात रुग्णाच्या प्रकृतीनुसार विविध प्राकृतिक उपचारपद्धतींचा वापर केला जातो. जलचिकित्सा, मृत्तिकाचिकित्सा, मालिश, योग, आहारोपचार आणि भौतिक चिकित्सा अशा विविध उपचारांचा त्यात समावेश आहे.

 

या उपचारपद्धतींचा मुख्य भर शरीराच्या आरोग्याबरोबरच जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविण्यावर आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, शारीरिक हालचाल आणि मानसिक स्वास्थ्य यांचे महत्त्व रुग्णांना समजावून सांगितले जाते. म्हणजेच उपचारांबरोबर निरोगी जगण्याची सवय लावण्याचाही प्रयत्न येथे होतो.

 

निसर्गग्राममध्ये योग सभागृह, सात्त्विक आहार केंद्र, विविध उपचार विभाग, संशोधन व विस्तार सेवा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुला-मुलींची वसतिगृहे, सभागृह आणि निवासी सुविधाही आहेत. गांधी स्मृती सभागृहाच्या माध्यमातून संस्थेच्या वैचारिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

*उपचारांपेक्षा आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार*

निसर्गग्राम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आरोग्याचा विचार केवळ आजार आणि उपचार एवढ्यापुरता मर्यादित राहू नये. आपण काय खातो, किती चालतो, किती श्रम करतो, पुरेशी झोप घेतो का आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करतो, या साध्या प्रश्नांमध्येही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली दडलेली आहे.

 

अर्थात, प्राकृतिक चिकित्सा ही प्रत्येक आजारावरील हमखास उपचारपद्धती आहे, असे मानणे योग्य नाही. आधुनिक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी ते उपचार सुरू ठेवूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूरक उपचारांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रातील संशोधन, उपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता यांनाही तितकेच महत्त्व आहे.

 

पुण्याला शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय सेवांचा समृद्ध वारसा आहे. त्यात आता प्राकृतिक चिकित्सा आणि योगशास्त्राच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची भर पडली आहे. देशाच्या विविध भागांतील रुग्ण, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. इच्छुकांनी निसर्गग्रामच्या -95111693564 या क्रमांकावर संपर्क करून येथे जाता येईल.

 

गांधीजींच्या काळात रुजलेला निसर्गोपचाराचा विचार आज आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पुढे जात आहे. येवलेवाडीतील निसर्गग्राम हे त्याचे ठोस उदाहरण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उभ्या राहिलेल्या या परिसराकडे केवळ एक रुग्णालय म्हणून न पाहता, आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार रुजविणारे राष्ट्रीय केंद्र म्हणून पाहायला हवे, असे केंद्र आहे.

 

*क्रमशः*

 

-युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments