पुणे, दि. २७: राज्यातील सर्व वाहनांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ३० जून २०२६ पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. अद्यापही एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, परवाना नूतनीकरण, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे यांसारख्या कामांवर निर्बंध लावण्यात आले आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांनाही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामेही (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जुन्या नंबर प्लेटवरून वाहनांची ओळख पटविणे अवघड जात असल्याने चोरी, अपघात आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्लेटमध्ये वाहनाचा क्रमांक, राज्याचा कोड आणि सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये असतात. ही प्लेट सहजपणे तुटत नाही, काढता येत नाही तसेच तिच्यात बदल करणेही शक्य नसते.
त्यामुळे सर्व वाहनधारक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक व बस संघटना तसेच वाहन वितरकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्यामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००


