पुणे दि. २२- : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन सुनावणी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून २९ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा सकाळी १० ते ११ या वेळेत, सांगली सकाळी ११.३० ते १२.३०, सोलापूर दुपारी १ ते २, कोल्हापूर दुपारी ३ ते सायंकाळी ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होईल. समितीचे सदस्य हे सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
या जनसुनावणीसाठी नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.
या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.


