पुणे, 25 एप्रिल २०२४ : मुल्य किंमत दृष्टीकोनातून पाण्याच्या शाश्वत आणि कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकोनॉमिक्स) आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या सहकार्यातून ‘प्रोजेक्ट जल मुल्य’ अभ्यास सुरू करण्यात आला आहे. एक वर्ष चालणाऱ्या या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाण्यासंदर्भातील सेवा आणि किंमतींच्या संरचनांचे मुल्यांकन करून अहवाल तयार करणे हे आहे. राहणीमानाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मुलभूत असलेल्या पुरेसा आणि उच्च गुणवत्तेच्या पाणीपुरवठ्याचे महत्त्व लक्षात घेत हा अभ्यास हवामान अनुकूल दृष्टीकोनातून कालांतराने शाश्वत जल सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर देणार आहे.
पुणे इंटरनॅशनल सेंटर मधील सायन्स टेक्नॉलॉजी अँड नॅशनल इनोवेशन इकोसिस्टिम विभागाचे संशोधन प्रमुख दीनानाथ खोलकर, किशोर पंप्सचे सह व्यवस्थापकीय संचालक व पीआयसीचे सदस्य सिद्धार्थ देसाई, पुणे नॉलेज क्लस्टरमधील सस्टेनेबिलिटी अँड एन्वायरमेंट विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. आश्विनी केसकर सरदेशमुख आणि गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्सच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट चे संचालक डॉ. गुरुदास नूलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


