▪️नागपूर, 17 मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय’चा शुभारंभ आज सकाळी रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, अ. भा. सेवा प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी श्री. परागजी अभ्यंकर तसेच वर्ग सर्वाधिकारी इकबाल सिंहजी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. याप्रसंगी सहसरकार्यवाह द्वय मुकुंदजी व रामदत्त चक्रधरजी उपस्थित होते.
▪️यंदाच्या वर्गात एकूण ९३६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना श्री. परागजी अभ्यंकर म्हणाले,‘संघ कार्य जाणून घेण्यासाठी आणि ते आचरणात आणण्यासाठी नागपूरला जाण्याचे सौभाग्य मिळावे, असे प्रत्येक स्वयंसेवकाला वाटत असते. संघकार्य हे जीवनकार्य व्हावे, ही भावना स्वयंसेवकांच्या मनात कायम असते. ही भूमी डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींची तपोभूमी आहे. संघ कार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. ▪️स्वातंत्र्यापूर्वी अनेक आव्हाने होती. त्याकाळात संघाने देशाच्या स्वातंत्र्यासाठीही काम केले. जंगल सत्याग्रहात डॉक्टरजींनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला होता. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडीत झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्याची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत, हे लक्षात घेऊन व्यवस्थेतही बदल करण्यात आले. पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढविण्यावर भर दिला जायचा. आता आव्हाने बदलली आहेत. त्याचे संदर्भ समजून घेत या आव्हानांना उत्तर द्यायचे असल्याने तशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गातून संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण व्हावी हा हेतू आहे. या वर्गात शिक्षार्थींना समाजातील सज्जन शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची याचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे. संपूर्ण भारतातून शिक्षार्थी या वर्गात सहभागी होतात. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होते. हिंदुत्वाच्या एकात्मतेचीही अनुभूती येथे होते.’ वर्गाचा समारोप १० जून २०२४ रोजी होणार आहे.
▪️रा. स्व. संघ – कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय (अधिकारी परिचय)▪️
मा. सर्वाधिकारी : श्री. इकबाल सिंहजी, मा. प्रांत संघचालक, पंजाब प्रांत
वर्ग कार्यवाह : श्री. अशोकजी अग्रवाल, मध्य क्षेत्र कार्यवाह
वर्ग पालक : श्री. परागजी अभ्यंकर, अ. भा. सेवा प्रमुख
मुख्य शिक्षक : श्री. नीलेशजी भंडारी, प्रांत शारीरिक प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र
सह मुख्य शिक्षक : श्री. कुणालजी, प्रांत शारीरिक प्रमुख, मेरठ
बौद्धिक प्रमुख : श्री. उदयजी शेवडे, संघठन मंत्री, संस्कार भारती, कोकण-गोवा प्रांत
सह बौद्धिक प्रमुख : श्री. कृष्ण प्रसादजी, प्रांत बौद्धिक प्रमुख, कर्नाटक दक्षिण
सह बौद्धिक प्रमुख : श्री. अणमजी, प्रांत बौद्धिक प्रमुख, जम्मू-कश्मीर
सेवा प्रमुख : श्री. धनीरामजी, क्षेत्र सेवा प्रमुख, पश्चिम उत्तर प्रदेश
व्यवस्था प्रमुख : श्री. सुनीलजी भुलगावकर, धर्म जागरण संयोजक, नागपूर महानगर
सह व्यवस्था प्रमुख :श्री. नितीनजी एदलाबादकर, अयोध्या भाग सहकार्यवाह, नागपूर महानगर
०००


