पुणे, दि. १२ : सामाजिक जीवनात महिला व बालकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या, पुणे आयुर्वेद शिक्षण मंडळाच्या संस्थापिका, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य, प्रसुतीतज्ञ डॉ.मीरा मधुकर परांजपे यांचे ११ जून रोजी दुख:द निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या. डॉ. मीरा यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिक डॉ.ताराबाई विष्णू लिमये यांच्या कन्या असलेल्या डॉ. परांजपे यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक व स्त्रीरोग प्रसुतितंत्र विभागाच्या प्रमुख म्हणून ३३ वर्षे सेवा दिली. तसेच त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून २०१७ मध्ये जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते .त्यांनी पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जर्मनीच्या ब्रेमेन विद्यापीठात मानद प्राध्यापक, बनारस हिंदू विद्यापीठ व गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या अध्यापक निवड समितीवर सदस्य म्हणून ही काम पाहिलेले आहे.
सामाजिक जीवनात कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन आणि महिलांसाठी वैद्यकीय शिबीरांचे सातत्त्याने आयोजनाला प्राधान्य दिले. डॉ. परांजपे यांना लॉस एंजेलिस येथे धन्वंतरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच सिंगापूर, कोलंबो आणि हाँगकाँग येथे तथागत आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.
आयुर्वेदिक शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
00000


