*ठाणे, दि.16(जिमाका) :-* दि.०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामधील मतदान केंद्रावर दि.१० ऑगस्ट २०२४ व दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण ३ हजार ३७६ नमूना नं.६ चे अर्ज प्राप्त झाले आहे. मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी ११४ तर तपशील दुरूस्तीसाठी ५८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, म्हणून दि.१७ ऑगस्ट २०२४ व दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी देखील विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते, त्यानुषंगाने दि.०६ ऑगस्ट २०२४ ते दि.२० ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये स्विकारण्यात येणार आहेत. दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे तसेच सर्व मतदारांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे नाव मतदारयादीमध्ये असल्याची व त्या नोंदी अचूक असल्याची खात्री करण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.
0000000000


