Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिल्लीतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाची पिंपरी -चिंचवड महापालिकेस भेट..

दिल्लीतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाची पिंपरी -चिंचवड महापालिकेस भेट..

पिंपरी, दि. ९ जानेवारी २०२४ :- केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून प्रकल्प राबविताना महापालिकेने नियोजनबद्ध काम केल्याचे दिसून येत असून शहरी विकास साधण्यासाठी असे नियोजनबद्ध व्यवस्थापन उपयुक्त ठरेल असे मत दिल्ली येथील केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण कार्यालयाच्या वतीने आलेल्या विविध राज्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. विविध कारणांसाठी नागरिकांशी संवाद साधण्याकरिता महापालिकेने विकसित केलेले स्मार्ट सारथी ऍप विकास प्रक्रियेत महत्वपुर्ण भूमिका बजावत असून अशा प्रकारचे संवाद माध्यम शासन संस्थांसाठी अनुकरणीय असल्याचेही या शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.

 

 

केंद्राच्या माहिती व प्रसारण कार्यालयाच्या वतीने आज १४ सदस्यीय पत्रकारांचे शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माहिती घेण्यासाठी आज आले होते. महापालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय इमारतीमध्ये या शिष्टमंडळाचे स्वागत उप आयुक्त मनोज लोणकर आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. शिष्टमंडळामध्ये वृत्त संपादक देवेंद्र साटी, ज्येष्ठ पत्रकार अरूण प्रताप सिंह, गिरीशचंद्र तिवारी, भुपेंद्र कंडारी, गिरीश पंत, विशाल बद्री, सुरेंद्र सिंग दशिला, अफजल अहमद राणा, ममता बोसोई, चौधरी अमितव दास, सुदीप कुमार रावत, रंजन प्रधान, मृणालकांती नंदा, देवनारायण महापात्रा, दिब्या ज्योती मोहंती यांच्यासह प्रेस इंफॉरमेशन ब्युरोचे पुणे कार्यालयाचे हर्षल आकुडे, उद्धव हिंगोले यांचा समावेश होता. महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, कनिष्ठ अभियंता सचिन मगर, प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक पाटील, स्मार्ट सिटीचे कनिष्ठ अभियंता सौरभ जगताप, सिटीओच्या ऋतुजा करकरे, केपीएमजीचे राजा डॉन, सुरभी सिंग, फॉक्सबेरीचे अंकित भार्गव तसेच महेश खांडगे, विवेक पाटील, सुभाष रे आदी उपस्थित होते.

 

यावेळी स्मार्ट सारथी ऍपचे संगणकीय सादरीकरण करून त्यातील विविध घटकांची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली.

 

विविध योजना राबवित असताना नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा विचारात घेतल्या पाहिजेत. शिवाय तेथील भौगोलिक परिस्थितीचा आणि संस्कृतीचा सारासार विचार करून त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. नागरी हित डोळ्यासमोर ठेऊन राबविलेल्या योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतात. अन्यथा त्या केवळ योजना पुर्ण केल्याचे व्यक्तीगत समाधान देऊन जातात, असे मत भुवनेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार भुपेंदर कंडारी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहराने शाश्वत विकास साधताना नागरी संवादावर आणि सहभागावर विशेष भर दिला असल्याचे दिसत आहे. त्यातून शहराचा नावलौकिक वाढत आहे. पायाभूत सोयीसुविधा, नागरिकांचे समाधान आणि आनंद यावरून राहण्यासाठी उत्तम शहराची निर्मिती होत असते. ही प्रक्रिया पिंपरी चिंचवड शहराने चांगल्या पद्धतीने साधली आहे, असे गढवालचे ज्येष्ठ पत्रकार अरूण प्रताप सिंह म्हणाले.

 

त्यानंतर शिष्टमंडळाने मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास भेट दिली. यावेळी ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जीचे उपाध्यक्ष ब्रिजेश कुमार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कचऱ्यापासून वीजनिर्मितीची संपुर्ण प्रक्रिया शिष्टमंडळास समजावून सांगितली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments