पुणे, दि. १० : केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालय आणि यूके-इंडिया एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इनिशिएटीव्ह (यूकेआयईआरआय) यांचा द स्कीम फॉर प्रमोशन ऑफ अॅकेडेमिक अॅण्ड रिसर्च कोलॅबरेशन (स्पार्क) या उपक्रमांतर्गत महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) आणि आयआयटी बॉम्बे,पवई यांच्यात संयुक्त प्रकल्प तयार करण्यासाठी नुकताच एक सामंजस्य करार झाला. ‘शिक्षण आणि संशोधनाच्या सहयोगातून प्रकल्प तयार करणे’ अशा योजनेनुसार या दोन्ही संस्थांनी एकत्र काम करायचे आहे, असा यामागचा मुख्य उद्देश आहे.
आयआयटीचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) डॉ. उपेंद्र भांडारकर, या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक (भारत) आणि आयआयटी मधील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्हज फॉर रूरल एरियाजच्या (सीटीएआरए) डॉ. बकुल राव तसेच या प्रकल्पाच्या सह-संशोधक (भारत) डॉ. वैशाली अनगळ आणि या प्रकल्पातील गटसदस्या डॉ. अमृता गरूड या दोघीजणी बीएनसीए तर्फे उपस्थित होत्या. या साऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या सामंजस्य करारानुसार सुरू करण्यात येणाऱ्या ‘बांधकाम क्षेत्रातील शाश्वततेवरील संशोधनात क्षमतावृद्धी’ या दोन वर्षांच्या संशोधन प्रकल्पाची रूपरेषा तयार करण्यात आली. या प्रकल्पाला यूकेआयईआरआय तसेच स्पार्क उपक्रमांतर्गत आर्थिक पाठबळ लाभले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. आयआयटी, इंग्लंडमधील लिव्हरपूल जॉन मूरेज विद्यापीठ, बीएनसीएसह औद्योगिक भागीदार म्हणून पुण्यातील कन्स्ट्रक्शन इंजिनियरींग रिसर्च फौंडेशन यासाठी एकत्र आले आहेत.
शाश्वततेसंबंधी संशोधन करणाऱ्या भारत व इंग्लंडमधील मिळून २० पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी समसमान पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी एका निवडपूर्व कार्यशाळेचे आयोजन बीएनसीएमध्ये ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. इंग्लंडमधील मुख्य संशोधक डॉ. अनुपा मनेवा आणि इंग्लंडमधील सह-संशोधक डॉ. मोहन श्रीवर्धेना यांनी या प्रकल्पासाठी ठरवलेल्या प्रगतीचे टप्पे तसेच अपेक्षित संशोधन विषय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शाश्वत पर्यावरणासाठी चक्रीय अर्थकारणाची भूमिका डॉ. बकुल राव यांनी विस्ताराने सांगितली; तर डॉ. वैशाली अनगळ यांनी या अभ्यासक्रमाची रूपरेषा सांगताना त्यातील विषय आणि प्रकल्पातील टप्पे विशद केले. डॉ. अमृता गरूड यांनी यात समन्वय आणि सूत्रसंचालन करताना प्रकल्पाच्या उपयोजनेतील नियम सांगितले. कार्यशाळेतून निवडण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ महिन्यांचे संयुक्त प्रशिक्षण देण्यात येईल. त्यातील दोन महिने भागीदार संस्थांमध्ये काम करताना प्रत्यक्ष कार्यानुभवावर भर देण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या ‘केपेबल’ या संकेतस्थळाचे उद्घाटन बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पाची सांगता २०२५ मध्ये प्रसारासाठी आयआयटी मुंबई येथे एका संयुक्त आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे करण्यात येईल. त्यामध्ये तोवर झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष तसेच बांधकाम क्षेत्रातील शाश्वततेसाठी लागणारे भविष्यातील संभाव्य समन्वयाच्या गोष्टी जाहीर केल्या
जातील.