पिंपरी, दि. १८ सप्टेंबर २०२४ :- श्रींच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट, पारंपरिक ढोल ताशांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची उधळण अशा विविध स्वरूपात भक्तीमय वातावरणात आणि ‘’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’’ अशा जयघोषात शहरवासियांनी गणरायाला निरोप दिला. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे पिंपरी आणि चिंचवड येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षात स्वागत करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील कराची चौक आणि चिंचवड येथील हुतात्मा चापेकर चौक येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर केली. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. तसेच ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. महापालिकेच्या वतीने या पथकांच्या प्रतिनिधींचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
पिंपरी येथे परिसरातील प्रमुख ३२ गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपआयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसदस्य, नगरसदस्या उपस्थित होते.
हुतात्मा चापेकर चौक, चिंचवड येथील नियंत्रण कक्ष येथे सुमारे ३३ गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अमित गोरखे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि तसेच मान्यवरांनी गणेशमंडळ प्रमुखांचे स्वागत केले. यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य मारूती भापकर, गोविंद पानसरे, सुरेश भोईर, गणेश लोंढे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे आदी मान्यवर तसेच पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, मूर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसेच यावर्षी प्रथमच क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली असून याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने मुर्तींचे विघटन करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देत अनेक मंडळांनी कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या. काही मंडळांनी महापालिकेच्या मुर्ती संकलन केंद्रांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांनी सर्व प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करुन अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, आरोग्य पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात आली होती.


