सुपे (ता.बारामती) येथे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे श्री. गणेश बिरादारसाहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती डॉ. श्री. सुदर्शन राठोडसाहेब तसेच, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुपे श्री. मनोजकुमार नवसरे यांनी जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. संस्था व विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेतील शिक्षक प्रवीण दुर्गे यांनी मुलांची ओळख करून दिली. साहेबांनी संस्था व शाळेची माहिती घेऊन सर्व परिसर पाहिला. शाळेतील मुलांशी संवाद साधला. या विशेष शाळेला भेट देऊन स्वतः भारावून गेल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागात अशी विशेष शाळा सुरू करून टिकवणे खूप अवघड काम आहे. यामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, इच्छाशक्ती असेल तर, माणूस काय करू शकतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी संघर्ष कसा करावा लागतो. याचे सरफिरा या चित्रपटाचे उदाहरण देऊन सांगितले. यातील अभिनेता आर्थिक अडचणीमुळे वडिलांच्या अंत्यविधीसाठी विमानाने येऊ शकला नाही. येईपर्यंत वडिलांचा अंत्यविधी होऊन गेला. या घटनेमुळे प्रेरित होऊन संघर्ष करून तो विमान कंपनीचा मालक झाला. तसेच, आपल्या मुलीला विशेष शाळा मिळाली नाही, म्हणून प्रेरित होऊन विशेष शाळा सुरू केली. तोच संघर्ष या ठिकाणी पहावयास मिळतो. अशा संघर्षातून ही शाळा उभी राहिलेली दिसते.
या मुलांवर निसर्गाने जरी अन्याय केला असेल तरी, त्यांना न्याय देण्याचे कार्य आपण सर्वजण करत आहात. या विशेष मुलांना फुलवण्याचं काम करत आहात. हे खूप महान कार्य आहे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक कसोटी आहे. असे त्यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


