पुणे, २५ सप्टेंबर २०२४ : तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेच्या वेल्हे-भोर परिसरातील अतिदुर्गम भागातील शिक्षण – ग्रामआरोग्य – ग्रामविकास – ग्राम-नगरसंगम उपक्रमांची माहिती सर्व देणगीदारांना द्यावी आणि त्यांच्याशी हितगुज करावे म्हणून ‘देणगीदार-हितचिंतक मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीचा मेळावा रविवार, दि. 29 सप्टेंबर, 2024, सायंकाळी 6 वाजता, गरवारे कॉलेज, कर्वे रोड येथे संपन्न होणार आहे. या निमित्त डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा बहुचर्चित असा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी संस्थेची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव मंदार अत्रे यांनी केले आहे.
1986 सालापासून गेली ३८ वर्षे तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास ही संस्था ‘विद्या विकासेन शोभते’ या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करून शिक्षणाच्या आधारे ग्रामविकास साधण्याचा प्रयत्न वेल्हे-भोर परिसरातील अतिदुर्गम भागामध्ये करीत आहे. शिक्षण – ग्रामआरोग्य – ग्रामविकास – ग्राम-नगरसंगम या चतुःसुत्रीच्या आधारावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना संघटित करुन राष्ट्र आराधनाचे कार्य न्यास करीत आहे. या परिसरामध्ये शिक्षणाचा प्रसार करुन पुढील पिढीमध्ये चारित्र्य, शिस्त, सामाजिक बांधिलकी हे सर्व गुण रुजवून सामाजिक सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण करण्यात न्यासाला यश मिळाले आहे.
परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेले सर्वश्रुत असे मुलांचे वसतिगृह हा तर एक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच मुलींसाठीही घर ते शाळा मोफत वाहन व्यवस्था सुरु करुन न्यासाने दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे. याचबरोबर ग्रामआरोग्य राखण्यासाठी आरोग्यरक्षक, पशुवैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात. स्वावलंबन आयामांतर्गत महिला बचत गट, व्यवसाय प्रशिक्षण असे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रकल्प कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय न्यासातर्फे चालविले जातात.
संस्थेतर्फे आज पर्यंत १४ गावांना विहिरी बांधून देण्यात आल्या आहेत ज्यामुळे येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. वेल्हे व भोर भागातील ग्रामस्थांसाठी स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी न्यासातर्फे एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम चालू आहे. या केंद्रातील अभ्यासक्रमांसाठी पुणे विद्यापीठ, बीएमसीसी कॉलेज अशा मोठ्या संस्थांची साथ लाभली आहे.
अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्र आराधनाचा प्रयत्न तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास करीत आहे. हे सर्व कार्य शासकीय अनुदानाशिवाय चालू आहे. समाजातील दातृत्व असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्या आर्थिक आधारावर हे कार्य
चालते.


