पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२४ :- स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये नागरी सहभागाचे महत्व पटवून देत पिंपरी चिंचवड महापालिकेने जनवाणी स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून स्पाईन रोड, घरकुल गेट क्र. १ येथील सतत कचरा आणि दुर्गंधी असणाऱ्या जागेचे रुपांतर एका स्वच्छ व सुंदर सार्वजनिक परिसरामध्ये केले आहे. तसेच या सांघिक यशस्वी प्रयत्नामुळे येथील नागरिकांच्या मनामध्ये स्वच्छतेचे महत्व रुजविण्यासही मदत झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शरद नगर आणि तुळजाई नगर येथील रहिवासी आणि रस्त्यावरून जाणारे प्रवासी स्पाईन रोड येथील घरकुलच्या गेट क्र. १ ठिकाणी कचरा टाकत असत. यामुळे संबंधित परिसरात दुर्गंधी पसरली होती तसेच प्रदूषण होत होते. परिसरातील ही समस्या दूर करण्यासाठी जनवाणी संस्थेने आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. जनवाणीच्या धोरणात्मक निरीक्षणाने आणि स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्याने, या समस्येचे मूळ कारण शोधून काढण्यात आले आणि या जागेचे सौंदर्यीकरण करण्यात आले. आता येथे नागरिकांनी कचरा टाकणे बंद केले असून नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या जागेचे रुपांतर सार्वजनिक जागेमध्ये झाले आहे.
घरकुल परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चंदनशिवे यांनी जनवाणी आणि त्यांच्या टीमसोबत २४ तास देखरेख आणि समन्वय ठेऊन परिसर स्वच्छ राहील याची खात्री करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांतून शहर व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा मोलाचा संदेश अनेकांपर्यंत पोहोचला आणि परिसरातील नागरिकांच्या मनात स्वच्छतेची भावना जागृत झाली.
कचरा संकलन आणि विलगीकरण यावर लक्ष केंद्रित करून स्थानिक रहिवासी जनजागृती मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी झाले. परिणामी, संबंधित ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले आणि जागेचे सुशोभिकरण करण्यात आले. येथे बसण्यासाठी बाक बसवण्यात आले आणि रिक्षा स्टँडची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे परिसराला एक नवीन ओळख मिळाली आणि सतत दुर्गंधी आणि कचरा असणाऱ्या जागेचे एका सार्वजनिक जागेमध्ये रुपांतर झाले.
स्वच्छ सांस्कृतिक महोत्सवातील सत्कार समारंभात आयुक्त शेखर सिंह यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक केले. आयुक्त सिंह म्हणाले, हा उपक्रम नागरी सहभागाचे महत्व अधोरेखित करतो. महापालिकेने स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संस्थांना सोबत घेऊन एका दुर्गंधीयुक्त जागेचे रूपांतर सार्वजनिक जागेमध्ये करून परिसराला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. स्वच्छ भारत मिशनची हीच ओळख असल्याचेही मत आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.
सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे म्हणाले, हा उपक्रम नागरी सहभागातून राबविलेल्या उपायांची किंवा उपक्रमांची ताकद दर्शवितो आणि महापालिका व नागरिक यांच्यातील संयुक्त प्रयत्नांमुळे झालेल्या बदलांचे महत्व अधोरेखित करतो.
चौकट –
नागरी सहभागातून झालेला कायापालट :
आधी:
स्पाईन रोड, घरकुल गेट नंबर १ जवळ दररोज कचरा साचत होते व नागरिक आणि प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून येथे कचरा टाकत होते
शरद नगर आणि तुळजाई नगर येथील रहिवासी कचरा डम्पिंगसाठी ही जागा वापरत असल्याने येथे दुर्गंधी आणि कचरा साचून प्रदूषण होत होते.
नंतर:
नागरी सहभाग आणि दररोजच्या निरीक्षणामुळे आमुलार्ग बदल घडला
परिसर स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली
याठिकाणी बसण्यासाठी बाक आणि रिक्षा स्टँडची उभारणी करण्यात आली
संबंधित परिसराचे संपूर्ण सौंदर्यीकरण करून नागरि
कांसाठी खुला करण्यात आला