Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीसूक्त पठणातून तब्बल ५ हजार महिलांनी केली 'देवी शक्तीची' स्तुती श्री...

श्रीसूक्त पठणातून तब्बल ५ हजार महिलांनी केली ‘देवी शक्तीची’ स्तुती श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम

 

पुणे : ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. तब्बल ५ हजार महिलांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, माता माता की जय… चा नामघोष आणि शंख वादनाच्या निनादाने नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट मंगलमय झाली.

 

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात झालेल्या सामुहिक श्री सूक्त पठण कार्यक्रमाचे. यावेळी मुख्य आयकर आयुक्त रिना झा-त्रिपाठी, डॉ.सतिश देसाई, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, निलेश लद््दड आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशा वादनाने झाली. त्यानंतर केशव शंखनाद पथक आणि श्रीमंत केसरी शंखनाद पथकातील वादकांचे शंखवादन झाले. कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्व आणि महती याविषयी मीनल चौरसिया यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्री सूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

 

अमिता अग्रवाल म्हणाल्या, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. यंदा श्रीसूक्त पठणाच्या मोठया कार्यक्रमासह नारीशक्तीचा सन्मान सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम देखील होणार आहे. पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments