Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी अशा सोडू नये - अजिंक्य देव दत्ताजी गायकवाड...

स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी अशा सोडू नये – अजिंक्य देव दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्राचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

पुणे 7 ऑक्टोबर 2024 : स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी अशा सोडू नये.कठीण असले तरी मार्ग सापडतो असे मत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील स्मॉल स्टेप सेंटर, सुंदरजी ग्लोबल अकॅडेमिया स्कूल यांनी एकत्र येऊन वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऑटीझम आणि सर्टिफाईड फाउंडेशन कोर्स इन ऑटीझम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त अभ्यासक्रम २०२३ पासून सुरू केले आहेत. त्याचा दुसरा दीक्षांत समारंभ कार्यक्रम रविवारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पार पडला. यावेळी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 80 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, त्यांची पत्नी व मुंबईतील अकॅडमी ऑफ लार्निंग अँड डेव्हलपमेंटच्या संचालिका आरती देव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य शास्त्र विभागाचे प्रमुख अभय कुदळे,प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, कोर्सचे संचालक डॉ. सुनील गोडबोले, सुंदरजी ग्लोबल अकॅडेमिया (एसजीए)च्या सहसंस्थापिका आणि संचालिका श्रीमती मसरत तवावाला, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राजन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पालकत्वाचा स्वतःचा अनुभव सांगत अजिंक्य देव म्हणाले की, पालकांनी स्वतःला दोष देऊ नये किंवा आमच्याबरोबरच असे का घडले असा विचार करू नये. कठीण असला तरी मार्ग सापडतो. त्यांनी स्वमग्नता असलेल्या बालकांसाठी आरती देव यांनी मुंबईत स्थापन केलेल्या शाळेचा प्रवास सांगितला.केंद्राच्या कार्याचे कौतुक करत ते म्हणाले की अशा प्रशिक्षित लोकांची पालकांना खूप गरज आहे.

 

प्रमुख पाहुण्या व मुंबईतील अकॅडमी ऑफ लार्निंग अँड डेव्हलपमेंटच्या संचालिका आरती देव म्हणाल्या की, आपल्या पाल्याला स्वीकारणे ही पहिली पायरी आहे. लहान मुलांना अमुक एक गोष्ट करू नये असा आपला दृष्टीकोन असतो. पण आपल्या पाल्याला विचार करण्याचा आणि पर्याय निवडण्यासाठी वाव द्या. त्यातून त्यांचे सुप्त गुण बाहेर येतील. स्वमग्नता असलेल्या मुलांचा स्वीकार आणि सन्मान करणे आवश्यक आहे. त्यासाठी शब्द किंवा चित्र किंवा इतर माध्यमातून त्यांच्यासोबत संपर्क प्रस्थापित करा असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या पाल्याची काळजी घेण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देखभालीसाठी इतरांवर देखील विश्वास ठेवा. हे करत असताना मातांनी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबात स्वमग्नतेची पार्श्वभूमी नसतांना देखील अशा अनेक विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबद्दल आरती देव यांनी कौतुक केले.

 

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राजन जोशी म्हणाले की ऑटीझमचे प्रमाण वाढत असताना अधिक संख्येने ऑटिजम व्यवस्थापन केंद्रांची गरज आहे. अशा केंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी आणि तज्ज्ञांची गरज असते.असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम हे केंद्र करत आहे.

 

डॉ.अभय कुदळे म्हणाले की हा प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहे याचा आम्हाला आनंद आहे.या कौतुकास्पद कार्याचा विचार करता, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुढे आणखी एक दमदार पाऊल उचलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असे पीएचडी रिसर्च सेंटर साठी अर्ज करावा .यामुळे प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी निर्माण होतील व त्यातूनच पुढील प्रशिक्षणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवता येतील .

 

या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना या उपक्रमाचे मुख्य आधारस्तंभ दत्ताजी गायकवाड म्हणाले की, गरजूंची मदत करणे हे मी माझ्या आई वडिलांकडून शिकलो. विशेष करून शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना पाठबळ देण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत आणि हे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवू.

 

डॉ. गोडबोले म्हणाले, स्वमग्नता आजाराची लक्षणे म्हणजे मुलांमधील सामाजिक संवादाचा अभाव, वारंवार एकसुरी संवाद, नजरानजर टाळणे, सूचनांचे पालन न करणे, संवादच करता न येणे. उदाहरण म्हणजे या समस्येने ग्रस्त मुले समाजात मिसळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर औषधच उपलब्ध नाही. केवळ समस्येची तीव्रता कमी करण्याची औषधे आहेत. त्याच्या थेरपीज आहेत. यात पालकांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्यात जाणीव नाही. प्रशिक्षित लोक नाहीत. हे लोक तयार करण्याची गरज आहे. यासाठीच स्वमग्नता प्रशिक्षण केंद्रातर्फे ७ महिन्याचा सर्टिफाईड कोर्स आणि १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. निवडक प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती मिळते. पदवीधर व्यक्ती, शिक्षक, पालक, मानसशास्त्र तज्ञ हा कोर्स करू शकतात. या कोर्समध्ये ३० हून अधिक उच्चशिक्षित तज्ज्ञ अनुभवी शिक्षक फॅकल्टी म्हणून शिकवितात. कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे १० वर्षांचा अनुभव असलेले ठिकाण, भरपूर प्रशिक्षण, शॅडो टीचर, थेरपी सेंटरमध्ये काम, सहायक म्हणून काम, पालकांनी हा कोर्स केल्यास मुलांचा सांभाळ करण्यासाठी उपयुक्त आहे. या लोकांना या क्षेत्रात मोठा वाव आहे, असेही डॉ. गोडबोले यांनी सांगितले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विप्रदा गद्रे यांनी केले तर मसरत तवावाला यांनी आभारप्रदर्शन केले .

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments