Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedघराघरात हसरे विद्यापीठ करा - प्राचार्य श्याम भुरके* *स्नेहांजली पुरस्कार प्रदान*

घराघरात हसरे विद्यापीठ करा – प्राचार्य श्याम भुरके* *स्नेहांजली पुरस्कार प्रदान*

 

पुणे – प्रत्येक घरातील डायनिंग टेबल हे हसरे विद्यापीठ करा. माणसामाणसातील,कुटुंबातील एकोपा वाढण्यास ते पूरकच ठरेल. हास्याचा चेहरा नेहमी तुम्हाला समाधान आणि आनंद देतो. असे मत सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य श्याम भुरके यांनी व्यक्त केले.

स्नेहल प्रकाशनाच्या वतीने सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली २१ वर्षे एका साहित्यिकाला ‘स्नेहांजली पुरस्कार’ दिला जातो. या वर्षीचा ‘स्नेहांजली पुरस्कार’ सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य श्याम भुर्के यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंदिरस्थापत्य व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर होते. स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे यावेळी उपस्थित होते. मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्राचार्य भुर्के पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले,मोठ्यांच्या सहवासात राहिले की, मोठे होता येते. मला हा सहवास मिळाला. पुरस्कार म्हणजे समाधान आणि आनंद आहे. आपण कायम रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. व्वा छान! असं प्रत्येकाला म्हणल्याने खूप काही जिंकता येते हे सूत्र आपण अंगीकारायला हवे. डायनिंग टेबल हे हसरे विद्यापीठ करा. एक पाऊल मागे टाकले की दोन पावलं पुढे जाता येतं, हास्याचा चेहरा कायम ठेवला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी आशुतोष बापट लिखित ‘सफर नेपाळची’ आणि अभिजीत केतकर लिखित ‘कथा वेरूळच्या कैलास निर्मितीची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ प्रवचनकार कल्याणीताई नामजोशी यांनी यावेळी दोन्ही पुस्तकांच्या विषय आणि आशय याचा परामर्श घेतला. सनातन धर्माशिवाय वेगळा धर्म अस्तित्वात नाही. उपासना पद्धतीसुद्धा समान आहेत.त्यातून मनातील धारणा दृढ होतात. काळाच्या ओघात काही संप्रदाय यांचा विशेष विकास झाला, तर काही मागे पडली. मूळात जगभर सनातन धर्मच होता, तोच राहील. सनातन धर्म बीजावर टिकला आहे. प्रत्येक अमूर्ताला मूर्त रूप आहे. संस्कृतीचा अविष्कार आहे. तत्त्वज्ञान मूळात समजले पाहिजे. भारतीय तत्वज्ञानाची सगुण-निर्गुण भूमिका, गूढ, इंगित आणि मर्म लेखकांना समजले आहे. त्यामुळे ते लेखनातून प्रकटले आहे. भारतीय तत्वज्ञानाचे विचारच या पुस्तकातून मांडले आहेत. संपन्न लिखाण दोन्ही पुस्तकांमध्ये झालेले आहे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी यावेळी सनातनम म्हणजे नित्य नूतनम ओंजळीतील पाणी पुन्हा ओंजळीत घेता येते का त्याप्रमाणे सनातन धर्म आहे असे सांगत प्राचार्य भुर्के यांचे अभिनंदन केले.

देवळात दर्शनाला जाणाऱ्या माणसाला मूर्ती कोणती हे सुद्धा माहित नसते अशी खंत व्यक्त करत आपली आपल्याच संस्कृती विषयी, मुर्तीशास्त्राविषयी सजगता असायला हवी,असे मत त्यांनी व्यक्त केले. दरवेळी नवनवीन पैलू कैलास लेणीमध्ये दिसतात नित्य नूतन वाटतं कैलास समजून घेणे महत्त्वाचे आहे. दगडाची मूर्ती मानवाच्या भावभावना प्रकट करणाऱ्या आहेत एवढे सामर्थ्य कलाकारांचे आहे आपण याची अनुभूती घ्यायला हवी.असेही ते म्हणाले.

पुस्तकाचे अंतरंग आणि मुखपृष्ठ केलेल्या मोहन थत्ते आणि सागर नेने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक करताना स्नेहांजली पुरस्कार आणि स्नेहल प्रकाशनाच्या उपक्रमांची माहिती दिली. आसावरी जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दीपा भंडारे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments