Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राम विकासाची राष्ट्रीय चळवळ निर्माण व्हावी - पोपटराव पवार*    ...

ग्राम विकासाची राष्ट्रीय चळवळ निर्माण व्हावी – पोपटराव पवार*    *सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार प्रदान सोहळा* 

 

पुणे – आजही बहुतांश भारत हा खेड्यामध्ये वसलेला आहे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची ही उपलब्धता करून दिली जाते. परंतु तरीही काहीच गावांचा विकास का होतो? याचा विचार केला पाहिजे. ग्रामविकासातून खऱ्या अर्थाने देशाचा विकास शक्य होणार असून त्यासाठी ग्राम विकासाची चळवळ संपूर्ण देशात उभी राहिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

 

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या नववा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अभियाना अंतर्गत आयोजित व कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांना ग्रामविकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

फर्ग्युसन महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, कुणाल टिळक, अभय माटे, विजय वरुडकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुहास शेंडे, विनायक थोरात, विनय कानडे, मधुकर भोसले, शेखर धुमाळ, ज्योत्स्ना वरूडकर, कान्होपात्रा गायकवाड, जगदीश गजऋषी, बाबू शिवांगी, डॉ आशिष पोलकडे, डॉ. तेजस्विनी गोळे, रमेश अग्रवाल, विशाल वरूडकर, डॉ सीमा निकम, पौर्णिमा इनामदार, एस. आर. जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

 

आत्मनिर्भर ग्राम विकास पुरस्कार वाबळेवाडी ता शिरूर जिल्हा पुणे, आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर, कारभारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा आणि रोहित बलुरे यांना विवेकानंद युवा रत्न पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. आशा खेडकर, रिफ्लेक्शन फाउंडेशन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

 

पोपटराव पवार म्हणाले, माती आणि पाण्याचे आरोग्य जर चांगले ठेवले, तरच देशातील शेतीचा कस चांगला राहणार आहे. माती आणि पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर भविष्यात देशासमोर मोठे संकट उभे राहणार आहे. हे संकट दूर करण्यासाठी आतापासूनच आपण तयार राहिले पाहिजे. त्या दृष्टीने आपण तरुणांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

 

गिरीश प्रभुणे म्हणाले, गावांचा विकास व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. अनेक तरुणही त्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु त्याची सुरुवात कशी करावी? याची अनेकांना जाण नसते. अशा तरुणांना योग्य दिशा जर दाखवली तर ग्रामविकास व्यापक पातळीवर होऊ शकेल. केवळ स्वतःच्या आत्मकेंद्रीत विकासाकडे लक्ष न देता समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे. त्यामध्ये तरुणांनी जर झोकून दिले, तर देश निश्चितच अधिक गतीने प्रगती करू शकेल.

 

कृष्णकुमार गोयल म्हणाले, केवळ एकाच व्यक्तीने सकारात्मक विचार केला तर आपल्या परिसरामध्ये बदल घडवू शकतो, हे उदाहरण पोपटराव पवार यांनी घालून दिले आहे. त्यांच्याकडून तरुणांनी प्रेरणा घेऊन सामाजिक सेवेचा वसा हाती घेतला पाहिजे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होत असताना तरुणांना सामाजिक कामाकडे वळवून समाजाचा आणि देशाचा विकास करणे, ही आज काळाची गरज आहे.

 

ग्रामविकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी आत्मनिर्भर ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. विजय वरुडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तेजस्विनी गोळे यांनी आभार मानले.

 

* फोटो ओळ – राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या नववा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अभियाना अंतर्गत आयोजित व कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांना ग्रामविकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच इतरही पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments