*
पुणे,दि.११:- मतदान जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभागाने (स्वीप) विविध उपक्रम राबविण्यात येतात. विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या परिसरात स्वीपच्या मदतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत येथील सिलेस्टियल सिटी येथे राहणाऱ्या रहिवाशांनी मतदान करण्याची शपथ घेतली. ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’, अशी शपथ सिलेस्टियल सिटी सोसायटीमधील सभासदांनी घेतली.
या सोसायटीमध्ये २२ विंग असून ७०४ फ्लॅट आहेत. सोसायटीमध्ये सुमारे तीन हजार नागरिक वास्तव्यास आहेत. सोसायटीमध्ये राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षात घेता आणि त्यांच्या सोयीसाठी येथे मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी सोसायटी चेअरमन प्राजक्ता रुद्रवाल, विलास गव्हाणे व इतर सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा निर्धार केला तसेच इतरांनाही मतदानाचे महत्व पटवून देऊन शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या स्वीप टीमच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे यावेळी उपस्थित होते.
०००


