Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिंचवड मतदार संघातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज*

चिंचवड मतदार संघातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज*

*

पुणे, दि. १७ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन येथे सुरु होणार असून मतमोजणी साठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी कळविली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार मतमोजणीसाठी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षणही सुरु करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी हा महत्वाचा टप्पा असून मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या आहेत.

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई राहील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात येणार असून अग्निशमन तसेच वैद्यकीय पथकही ठेवण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, मतमोजणीसाठी येणारे मनुष्यबळ व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात येणार असून यादिवशी मतमोजणीसाठी येणाऱ्या सर्व घटकांना कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे, असेही श्री. पवार यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments