*
पुणे, दि. १८ : विधानसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ नोव्हेंबर २०२४ रोजी स्प्रिंगडेल स्कूल, सिंहगड कॅम्पस आंबेगाव बु. येथे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
श्री. माने म्हणाले, खडकवासला विधानसभा मतदारसंघात साहित्य व्यवस्थापनचे कार्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी लागणाऱ्या मतदान यंत्रे, मतपत्रिका, मतदार याद्या, शिक्के, शाई, सील, लेखन सामग्री आणि इतर आवश्यक वस्तूंची उपलब्धता वेळेत सुनिश्चित केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी या वस्तूंच्या वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाने चोख तयारी केली आहे.
मतदान साहित्याचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करण्यात आले असून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्यापासून ते निवडणूक संपल्यानंतर परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी कामकाजावर सतत लक्ष ठेवावे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाने यंत्रणेची पूर्वतपासणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर उपाय काढण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतर्क आहेत, असेही श्री. माने यांनी सांगितले.


