*
पुणे ः ई-कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी कार्यरत पूर्णंम इकोविजन फौंडेशनचा (PEF) दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा पुण्यात साजरा करण्यात येणार आहे. रविवार दि.१/१२/२४ रोजी सायकाळी पाच ते सात या वेळेत बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहामध्ये होणार आहे. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक भाऊ काटदरे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मणेरीकर यांनी दिली.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे पूर्णम इकोविजन ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. वर्धापन दिनानिमित्त ‘पुनर्चक्र – शून्य कचरा प्रदर्शन’ सादर करण्यात येणार आहे. ज्याच्यामुळे समाजबांधवांचा कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. शनिवार (दि.३० नोव्हेंबर) आणि रविवार (दि.११ डिसेंबर) सकाळ ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हे प्रदर्शन सुरू राहील.
मणेरीकर म्हणाले,” २०१२ पासून संस्थेच्या कार्याची सुरूवात झाली. पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासोबत कचरा व्यवस्थापन या विषयावर लक्ष्य केंद्रित करून कार्य सुरू झाले. यालाच शाश्वत विकास आणि लोकसहभागाची जोड मिळाली आहे. फॅब्रिक अपसायकलिंग, ई-वेस्ट संकलन, ई- कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि कंपोस्टिंग या विषयात योग्य मार्गदर्शन देण्याचे काम संस्था करते.”
या कार्यक्रमात पूर्णम तर्फे दिले जाणारा पर्यावरण पूरक गृह निर्माण सोसायटीसाठीचा “पर्यावरण हितवर्धिनी ” आणि दुसरा उद्योजकांसाठी दिला जाणारा “ पर्यावरण मित्र ” या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ज्या गृह निर्माण सोसायट्या अधिकाधिक पर्यावरणपूरक निकष पूर्ण करतील अशा पाच मधून एका सोसायटी निवड पुरस्कारासाठी होणार आहे. तसेच नवउद्योजक असणाऱ्या पर्यावरण मित्र आणि वय ३५ च्या आतील योग्य तरुण व्यावसायिकाला “पर्यावरण मित्र “ या पुरस्काराने गौरवले जाईल. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.


