पुणे, दि. ३०: भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून आपल्या मुळांपर्यंत जाताना शाश्वत विकासाचे स्वतःचे स्वयंपूर्ण प्रारूप (मॉडेल) तयार करणे शक्य आहे, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.निवेदिता भिडे यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील शाश्वतता व विकास अध्यापन संस्थेच्या (आयएसडीएस) नवीन परिसर व वास्तूचे उद्घाटन झाले.
यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी, सदस्य जयंत इनामदार, शाळा विभागाच्या संचालक सीमा कांबळे, सचिव पी. व्ही. एस. शास्त्री तसेच संस्थेच्या भानूबेन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य आणि आयएसडीएसचे संचालक डॉ.अनुराग कश्यप, कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जोशी, प्रा. निधी दीक्षित, प्रा.सौरभ साबळे, प्रा.नम्रता धामणकर आणि डॉ. प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. भिडे म्हणाल्या की, आयएसडीएसची उद्दीष्टे ही उत्तम असून व्यवहार्य आहेत. शाश्वत विकासाच्या मूल्यांचा वापर शिक्षण व संशोधनासाठी येथे केला जाणे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या १७ शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांपलीकडे जाताना आपल्याला ‘सर्वांभूती परमेश्वर’ या उक्तीनुसार समष्टीचे पोषण करण्यासाठी जीवनात संयम आणि नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी आपल्या मर्यादांमधून बाहेर पडताना उपलब्ध असणाऱ्या संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करत आवश्यक जीवनकौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी पाश्चात्यांकडील व्यक्तीवाद तसेच ‘वापरा व फेका’ या चुकीच्या गोष्टीही बाजूला साराव्या लागतील.
यावेळी डॉ.अस्मिता जोशी यांनी आयएसडीएसची गेल्या दोन वर्षातील वाटचाल सांगताना सर्वसमावेशक विकासाच्या कामाचा आढावा घेतला. आधुनिक आव्हानांना तोंड देताना आम्ही लवचिकता आणि व्यापक उपाय शोधताना आम्ही संशोधन, प्रशिक्षण आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उत्तरे शोधणार आहोत, असे सांगितले.
डॉ. कश्यप म्हणाले की, या संस्थेतून जगभरात मान्यता पावलेली शाश्वत विकासाची उद्दीष्टे शिकण्यासाठी, त्यात कौशल्ये, संशोधन आणि कल्पकता निर्माण करण्यासाठी प्रेरित करेल. तसेच शाश्वत विकास हेच उद्याचे भविष्य असणाऱ्या या काळात आपल्याकडील असमानता, हवामान बदल, ढासळते पर्यावरण आणि शांतता व न्याय या गोष्टींचे या संस्थेच्या अभ्यासातून विचारमंथन केले जाईल.
यावेळी आयएसडीएसवरील माहितीपट दाखवण्यात आला.