पुणे,२ डिसेंबर 2024 : असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स तर्फे प्लास्टो 2025 या प्रदर्शनाचे आयोजन 8 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्वेंशन सेंटर, मोशी येथे करण्यात येणार आहे. यानिमित्त हॉटेल ग्रँड शेरेटन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रिय हवाई वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्राज इंडस्ट्रीज लि.च्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष घनश्याम देशपांडे ,टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर आश्विन शास्त्री,सीएसआयआर -एनसीएल चे संचालक डॉ.आशिष लेले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला एपीपी चे अध्यक्ष श्री. अनिल नाईक,प्लास्टो 2025 चे अध्यक्ष श्री. अजय झोड,एपीपी चे संस्थापक सदस्य श्री. अरुण कुंभोजकर व एपीपी चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आनंद कुंभोजकर यांनी केले. अभिनेते प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ४०० हून अधिक पुण्यातील प्लास्टिक व्यावसायिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्रिय हवाई वाहतूक राज्य आणि सहकार राज्य मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुण्याला जागतिक नकाशावर नेण्यामध्ये उदयॊग क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे आणि त्यामध्ये प्लास्टिक उद्योगाने आपले योगदान आर्थिक विकासामध्ये दिले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जागेची गरज आहे असे सांगत ते म्हणाले, उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच सहकार्याची भूमिका घेईन. कार्यक्रमाला उपस्थित संख्या पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि प्रदर्शनाच्या दिवसात सुद्धा ते उपस्थित राहतीलअसे सांगितले.
प्राज इंडस्ट्रीज लि.च्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष श्री. घनश्याम देशपांडे म्हणाले की, प्लास्टिक हा शाप आहे की वरदान आहे असा प्रश्न वारंवार विचारला जातो. पण प्लास्टिक हे शाप नसून वरदान आहे. आपल्याकडे प्रतिभा आणि ज्ञान आहे आणि आपण नाविन्यपूर्ण उपाय विकसित करू शकतो.
चीन मधील उद्योगांचा दाखल देत टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर श्री. आश्विन शास्त्री म्हणाले की, आपली मानसिकता बदलून अधिक व्यापक विचार केला पाहिजे. लहान व मध्यम उद्योगांनी भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करत व्याप्ती वाढवली पाहिजे.
सीएसआयआर -एनसीएल चे संचालक डॉ.आशिष लेले म्हणाले की , विविध क्षेत्रांचा मेळ असल्याने प्रदर्शन भरवण्यासाठी पुणे हे एक योग्य ठिकाण आहे. ते पुढे म्हणाले की, शाश्वतता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था ही केवळ जगासाठी नव्हे तर पुण्यासारख्या शहरांसाठीही महत्वाची बाब आहे. नवकल्पना, तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योगाचे केंद्र असलेले शहर म्हणून आपण या नवीन प्रवाहांचा स्वीकार केला पाहिजे. ‘प्लास्टो 2025’ मध्ये इनोव्हेटर्स पॅव्हेलियनचे नियोजन केले जात आहे याचा मला खूप आनंद आहे.
सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक कलाकार श्री. प्रविण तरडे आणि रमेश परदेशी यांची देखील भाषणे झाली. प्रवीण तरडे यांनी एपीपी टीम बरोबर चायनाप्लास प्रदर्शनाला भेट दिली होती आणि त्या पातळीवर उपस्थित प्रत्येक मराठी उद्योजक सुद्धा मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला.
प्लास्टो 2025 बाबत माहिती देताना एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले की, हे 8 वे प्लास्टो प्रदर्शन असून दरवेळेस याची व्याप्ती अनेक पटीने वाढत आहे. एपीपीचा मुख्य उद्देश प्लास्टिक उद्योगाचा विकास करणे हे आहे.
प्लास्टो 2025 चे अध्यक्ष अजय झोड म्हणाले की, उत्पादक,पुरवठादार आणि सर्व भागधारकांसह हे प्रदर्शन म्हणजे सर्वांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम आहे. शाश्वत विकास आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणे हे आमचे ध्येय आहे .
यावर्षी सदस्य कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून या क्षेत्राच्या प्रगती आणि कल्याणाप्रती आमच्या संस्थेची कटिबध्दता दर्शविते. एपीपीचा मुख्य उपक्रम असलेले प्लास्टो प्रदर्शन हे 8 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्वेंशन सेंटर, मोशी येथे अधिक भव्य व व्यापक पातळीवर आयोजित केले जाणार आहे. 1 लाख पन्नास हजार चौरस फुटावर विस्तारलेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून ८० टक्के बुकिंग याआधीच झाले आहे. मिलाक्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (डायमंड प्रायोजकत्व ) , शिबौरा मशीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एल. के. मशिनरी इंडिया प्रा.लि ( प्लॅटिनम प्रायोजकत्व), तसेच अन्य काही नामांकित कंपन्यांनी गोल्ड व सिल्व्हर प्रायोजकत्व द्वारे या उपक्रमाला पाठबळ दिले आहे.
नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि उद्योगातील उत्कृष्टता प्रदर्शित करण्यासाठी 1989 पासून प्लास्टो हे विश्वासार्ह व्यासपीठ ठरले आहे. पुण्यातील प्लास्टिक उद्योग आणि एमएसएमईच्या कल्याणाकरिता समर्पित ना-नफा संस्था असलेल्या असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) तर्फे आयोजित प्लास्टो 2025 उद्योगातील प्रमुख नेतृत्व व भागधारकांना अद्वितीय प्रदर्शनाची संधी प्रदान करते. आपल्या ब्रँडची पोहोच वाढवण्यासाठी,संभाव्य ग्राहकांशी जोडण्यासाठी आणि प्लास्टिक क्षेत्राच्या विकासात योगदान देण्यासाठी ही एक अनोखी संधी आहे.
असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) ही संघटना 1981 मध्ये पुण्यात स्थापित करण्यात आली. या संघटनेचे मुळ उद्दिष्ट प्लास्टिक व निगडीत उद्योगांचा विकास,सर्व सदस्यांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे,प्लास्टिक आणि पॉलिमर उद्योगातील आव्हानांवर उपाय शोधणे तसेच तंत्रज्ञानातील प्रगती बाबत सदस्यांना शिक्षित करणे हे आहे.
आभार प्रदर्शन समीर कोठारी एपीपी सेक्रेटरी यांनी केले.


