पुणे, 8 डिसेंबर 2024: पूना रिजन ब्रिज संघटना यांच्या वतीने आयोजित व ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया(बीएफआय), महाराष्ट्र ब्रिज संघटना(एमबीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत आशा शर्मा व पूजा बात्रा, वासंती शहा व गोपीका टंडन या दोन जोड्यानी पात्रता फेरीतील पहिल्या 22 सामन्यांअखेर अव्वल दोन स्थान पटकावून अंतिम फेरीत आगेकूच करण्यासाठी आपले आव्हान कायम राखले. शितल बन्सल – सारिका मित्तल, अलका क्षीरसागर – भारती डे आणि एकता चढ्ढा – बिना मल्होत्रा या जोड्याणी पहिल्या पाच मानांकनामध्ये स्थान मिळवून अंतिम फेरीकडे आगेकूच केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला पेअर्स विभागात 10 पटांवर प्रत्येकी पाच फेऱ्या पार पडणार असून एकूण 50 सामन्याअखेर अव्वल 18जोड्या ऑल प्ले ऑल राऊंड रॉबिन स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या सर्व फेऱ्यानंतर सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या जोडीला राष्ट्रीय विजेतेपद मिळणार आहे.यानंतर मिश्र दुहेरी, वरिष्ठ सांघिक गोल्ड व सिल्व्हर सांघिक आणि अखेरीस अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅच पॉइंट पेअर्स या स्पर्धेने सांगता होणार आहे.
तत्पूर्वी, आशा शर्मा व पूजा बात्रा या सातव्या मानांकित जोडीने 99 गुणांची निश्चिती करताना पहिल्या पात्रता फेरीअखेर अव्वल स्थान मिळवले. अत्यंत चुरशीच्या सामन्यात वासंती शाह व गोपिका टंडन या नवव्या मानांकित जोडीने 93 गुणांची कमाई केली. तिसऱ्या पटावर शितल बन्सल व सारिका मित्तल या 23व्या मानांकित जोडीने 92गुणांची कमाई करताना आपले आव्हान कायम राखले. तर, अलका क्षीरसागर व भारती डे या तिसऱ्या मानांकित जोडीने 90गुणांची निश्चिती करताना चौथे स्थान मिळवले. एकता चढ्ढा व बिना मल्होत्रा या 14व्या मानांकित जोडीने 79 गुणांची कमाई केली.
स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर अमला रुईया यांनी मिनल ठाकूर यांच्या साथीत 7 गुणांची कमाई करताना या यादीत 18वे स्थान मिळवले. राऊंड रॉबिन साठी देखील त्यांनी आपले आव्हान कायम राखले.
स्पर्धेचे उद्घाटन अमला रुईया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अलका क्षीरसागर, शिरिष करकरे, बीएफआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद सामंत, एमबीएचे एमेरीटस अध्यक्ष जेके भोसले, अनिल पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.