पुणे, ८ डिसेंबर, 2024: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पिछाडीचे कोणतेही दडपण न घेता पाटणा पायरेट्स संघाने सहा गुणांच्या पिछाडीवरून उत्तरार्धात सामन्यास कलाटणी दिली आणि जयपूर पिंक पँथर्स संघावर ३८-२८ असा रोमहर्षक विजय नोंदविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मध्यंतराला जयपूर संघाने १८-१२ अशी आघाडी घेतली होती.
पाटणा पायरेटस् संघाने येथील पहिल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सकडून पराभव स्वीकारला होता. तरीही त्यांनी आतापर्यंत १६ पैकी नऊ सामने जिंकले असल्यामुळे आणि माझी विजेता असल्यामुळे त्यांच्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती जयपुर पिंक पंथरस संघाने आतापर्यंत १६ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले होते येथील पहिल्या सामन्यात त्यांना यु मुंबा संघाविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली होती.
सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी सावधच पवित्रा घेतला होता त्यामुळेच की काय दहाव्या मिनिटाला ५-५ अशी बरोबरी होती. तरीही दोन्ही संघांचे आघाडी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. हळुहळु जयपुर संघाने उत्कृष्ट अष्टपैलू खेळाच्या जोरावर आघाडी घेत वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश आले. मध्यंतरापर्यंत शेवटच्या मिनिटात त्यांनी पहिला लोण नोंदवित आपली बाजू वरचढ केली. पाटणा संघाकडून झालेल्या चुकांचाही त्यांना फायदा झाला.
उत्तरार्धात सुरुवातीपासूनच पाटणा संघाच्या खेळाडूंनी जयपूर संघाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यशही आले. उत्तरार्धानंतर पाचव्या मिनिटालाच त्यांनी जयपूर संघावर लोण चढविला आणि आघाडी घेतली. ३० व्या मिनिटाला त्यांच्याकडे २४-२० अशी आघाडी होती. पुन्हा आणखी एक लोण चढवीत त्यांनी आपली बाजू बळकट केली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाकडे ३२-२४ अशी आघाडी होती.
पाटणा संघाकडून देवांक (१४ गुण) व अयान (६ गुण) यांनी खोलवर चढाया केल्या तर अंकित (५ गुण) याने उत्कृष्ट पकडी केल्या जयपूर संघाकडून अर्जुन देशवाल (७ गुण) नीरज परवाल (५ गुण) यांनी चढाईत तर अंकुश राठी ३ गुण याने पकडीत चांगली लढत दिली
———-