Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआग्य्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त पुण्यात लाक्षणिक पालखी सोहळा उत्साहात पुणे महानगरपालिका व...

आग्य्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त पुण्यात लाक्षणिक पालखी सोहळा उत्साहात पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन ; यंदा ३५८ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा… असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त आयोजित लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. शिवरायांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला ३५८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालखी सोहळा व उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५८ व्या आग्य्राहून सुटका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरुप किल्ले राजगड येथे परतले, त्या घटनेला 358 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मिलींद वर्लेकर, कॉसमॉस बँकेचे संचालक मिलींद पोकळे, पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, राजगडाचे गडकरी सूर्यकांत भोसले, शिल्पकार विवेक खटावकर, सोहळ्याचे पालक विश्वस्त किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर मोळक, पराग ठाकूर, रणजित पठारे, राजेंद्र भोसले, नाना काटे, नाना वालगुडे, मंडळाचे संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, समिर रुपदे, मंगेश राव, योगेंद्र भालेराव, अमित दारवटकर, अमोल व्यवहारे, सागर चरवड, सतिश सोरटे, वीरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

यंदा सोहळ्याचे ४४ वे वर्ष आहे. यावेळी इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांचे व्याख्यान झाले. आग्र्याहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुनर्जन्म होता. त्यामुळे दरवर्षी पुण्यात आणि गडावर उत्सव साजरा केला जातो.

शनिवार, दिनांक २१ रोजी दुर्ग राजगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, स्थिर वादन, मर्दानी खेळ तसेच शिवव्याख्याते विनायक खोत यांचे व्याख्यान होणार आहेत. विविध क्षेत्रातील वक्ते, इतिहासकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी सूर्योदयाला सकाळी ६ वाजता वंशपरंपरेने किल्लेदार असणारे सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात पाली दरवाजा- सदर आणि पद्मावती देवीचे मंदिर असा निघणार आहे. अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी शिवप्रेमींनी संपूर्ण सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments