पुणे, दि. २७: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालय, शनिवार पेठ न. वि. गाडगीळ शाळा येथे सकाळी 10.30 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पंधरवडा कालावधीत शासकीय विभागीय ग्रंथालयामार्फत स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, वाचक सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या ग्रंथ प्रदर्शनात प्रसिद्ध साहित्यिकांचे नामांकित ग्रंथ प्रदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहेत. शासकीय विभागीय ग्रंथालय कार्यालयातील नामांकित ग्रंथ, वर्तमान पत्रे व नियतकालिकांचे प्रदर्शन प्रामुख्याने भरविण्यात येणार आहे. तसेच दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण प्रक्रियेची प्रात्यक्षिकेही यानिमित्त पहावयास मिळणार आहे.
तरी अधिकाधिक वाचक सभासद, विद्यार्थी व नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे यांनी केले आहे.
0000


