पुणे :
पुणे पुस्तक महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली. ४० कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली. जगासाठी हा महोत्सव आता प्रारुप ठरला आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव झाला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी योगदान दिलेल्या विविध व्यक्तींच्या गौरवाचा कार्यक्रम सोमवारी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या प्रांगणात झाला. त्यावेळी पाटील बोलत होते.
एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुख्य संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, आनंद काटीकर, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे या वेळी उपस्थित होते. पुढील महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.
पाटील म्हणाले, महोत्सवाच्या नऊ दिवसांत पाचशे स्वयंसेवक झटले. कोणत्याही दुर्घटनेविना हा महोत्सव पार पडला. तरूण स्वयंसेवकांना या महोत्सवाने अनेक प्रकारचे अनुभव दिले. त्यातून खूप शिकायला मिळाले. त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होईल.
पुणे शहराला उत्सव, महोत्सवांची परंपरा आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता पुणे पुस्तक महोत्सव ही महाराष्ट्राची नवी ओळख होत आहे. स्वयंसेवकांच्या जोरावर हा महोत्सव पार पडला. प्रकाशकांच्या चेहऱ्यावरचे हसू मोलाचे होते. ग्रंथांवर उपजीविका करणारी माणसे महत्त्वाची आहेत, असे तरडे यांनी सांगितले.
महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादासह समाजमाध्यमांतूनही प्रचंड प्रतिसाद होता. १ कोटींपेक्षा जास्त लोकांनी महोत्सवाच्या चित्रफिती पाहिल्या. ७७ लाख लोकांनी महोत्सवाविषयी ‘सर्चिंग’ केले. या महोत्सवाच्या आयोजनात ३० खाते प्रमुख होते. तसेच स्वयंसेवकांचेही योगदान महत्त्वाचे होते, असे राजेश पांडे यांनी नमूद केले.
चौकट
विद्यापीठाचे वाचन सर्वेक्षण…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महोत्सवाच्या काळात वाचनसवयींचे सर्वेक्षण केले.या सर्वेक्षणाची प्राथमिक निरीक्षणे डॉ. गोसावी यांनी मांडली. सर्वेक्षणात २४ ते ५० या वयोगटातील ५५ टक्के पुरुष, ४५ टक्के महिलांचा समावेश होता. महिलांना चरित्र आणि अध्यात्माची पुस्तके वाचायला आवडतात. पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांना माहितीपर, चरित्र, इतिहासविषयक पुस्तकांमध्ये रस आहे. प्राथमिक शिक्षण झालेल्यांचा अध्यात्म, धार्मिक पुस्तकांकडे कल आहे, तर नोकरदारांना चरित्र, इतिहास, स्वमदत (सेल्फ हेल्प) प्रकारची पुस्तके आवडतात. विद्यार्थ्यांचा कल इतिहास आणि तांत्रिक विषयांच्या पुस्तकांचे असल्याचे दिसते. या सर्वेक्षणाचे सविस्तर निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.


