पुणे, ९ जानेवारी २०२५: कुशमन अॅण्ड वेकफिल्ड या भारतातील एका सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट सर्विस कंपनीतर्फे आज पुण्यातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोइद्दिन पटेल यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या जबाबदारीत मोइद्दिन कंपनीचे पुण्यातील कामकाज पाहतील. प्रगतीला चालना देणे, क्लाएंटसोबतचे संबंध वृद्धिंगत करणे आणि महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कुशमन अॅण्ड वेकफिल्डचे अस्तित्व अधिक बळकट करणे अशा बाबींचा यात समावेश आहे.
रिअल इस्टेटमधील अनुभवी आणि २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले मोइद्दिन यांच्याकडे व्यवहारात्मक व्यवसाय, टीम नेतृत्व आणि क्लाएंटसोबत बळकट, दीर्घकालीन भागीदारी निर्माण करणे यातील प्रचंड अनुभव आहे. कुशमन अॅण्ड वेकफिल्डसोबतच्या दशकभराच्या प्रवासात त्यांनी मुंबईत टेनंट रिप्रेझेंटेशन म्हणजेच भाडेकरू प्रतिनिधीत्व या विभागाचे यशस्वी नेतृत्व करत या भागात कंपनीच्या यशात लक्षणीय भर घातली आहे.
मोइद्दिन यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला साजेशी आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान (भौतिकशास्त्र) विभागाची पदवी घेतली आहे आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस)मधून पोस्ट ग्रॅज्युएनश डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केले आहे.
कुशमन अॅण्ड वेकफिल्डचे चीफ एक्झिक्युटिव्ह, भारत आणि दक्षिणपूर्व आशिया आणि एपीएसी टेनंट रिप्रेझेंटेशन अंशुल जैन म्हणाले, “टीम्समध्ये सहकार्य आणि उत्कृष्टतेला चालना देत आमच्या क्लाएंट्ससाठी अतुलनीय कामगिरी करणारे मोइद्दिन हे दशकभराहून अधिक काळ आमच्या टीमचे महत्त्वाचे आणि मौल्यवान सदस्य आहेत. बाजारपेठेचे सखोल ज्ञान, धोरणात्मक दृष्टिकोन आणि दमदार तज्ज्ञता यामुळे पुण्यातील बाजारपेठेत आमच्या व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी ते अगदी योग्य निवड ठरतात. या शहरात ते आमच्या अस्तित्वाला बळकटी देतील आणि प्रगतीच्या नव्या संधींचा वेध घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
या नव्या जबाबदारीबद्दल मोइद्दिन पटेल म्हणाले, “पुण्यात कुशमन अॅण्ड वेकफिल्डच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणे हा मी माझा सन्मान समजतो. या शहरात प्रगतीच्या प्रचंड संधी आहेत आणि या भागातील आमचे क्लाएंट आणि भागीदार यांच्यासाठी अतुलनीय मूल्य आणि नाविन्यपूर्ण पर्याय देऊ करण्यासाठी येथील प्रतिभावान टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”


