Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण :...

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा*

 

 

*रोजगारभिमूख कौशल्य प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ*

 

 

*ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा सह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू*

 

 

मुंबई, दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे आजपासून ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या STEP कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील युवकांसाठी एकूण २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे.

 

 

यावेळी ऑनलाईन पद्धतीने अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ.अमित सैनी,व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालया चे संचालक सतीश सुर्यवंशी,४०० आयटी आय चे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

 

 

मंत्री श्री लोढा म्हणाले की, उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत. पदवी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास आणि कौशल्यवृद्धी आवश्यक असून, त्यातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण किंवा कामासोबत प्रशिक्षण घेता यावे, यासाठी दोन, तीन किंवा चार तासांचे प्रमाणित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार असून, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांकडे केवळ शैक्षणिक पदवी असणे पुरेसे नसून, उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक आणि रोजगारक्षम कौशल्ये असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये STEP अर्थात अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ८ ऑक्टोबर २०२५ रोजी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या कार्यक्रमाचा पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात आला आहे.

 

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित (New Age) अभ्यासक्रमांचा समावेश STEP कार्यक्रमात करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, HVAC आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे युवकांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

 

या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ४१४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि १२२ शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांचा (GTHS) समावेश करण्यात आला. या टप्प्यात एकूण १,७६६ प्रशिक्षण तुकड्या सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये ५१,०४२ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला. यापैकी ३७,९८१ प्रशिक्षणार्थींचे मूल्यांकन (Assessment) पूर्ण करण्यात आले आहे.

 

STEP कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन निधीचा (District Plan Fund) वापर करण्यात आला. या टप्प्यात एकूण ८८ प्रशिक्षण तुकड्यांना मंजुरी देण्यात आली असून, १,८४४ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी ५९ प्रशिक्षण तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

 

कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५६ शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांमधील ६७ प्रशिक्षण तुकड्या आणि ३४६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८१७ प्रशिक्षण तुकड्या अशा एकूण ८८४ प्रशिक्षण तुकड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या टप्प्यासाठी २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध असून, त्यापैकी १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे.

 

तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दक्ष (DAKSH) निधीतून तरतूद करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दक्ष प्रकल्पांतर्गत निधीची मागणी करण्यात येणार आहे.

 

पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा कौशल्य विकास साधणे आणि उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे, हा STEP कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे राज्यातील युवकांच्या रोजगारक्षमतेला चालना मिळेल, असा विश्वासही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

………………………………….

चौकट

 

*महिलांसाठी विशेष अल्पमुदतीचे अभ्यासक्रम*

 

महिलांच्या कौशल्य विकासासाठीही या कार्यक्रमांतर्गत विशेष अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात २६० प्रशिक्षण तुकड्यांच्या माध्यमातून ७,२३४ महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ब्युटी थेरपिस्ट यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

 

### *आयटीआयचा ब्रँड अधिक उंच व्हावा – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा*

 

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणल्या की, अल्पमुदतीच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून कच्च्या मालासह प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणासाठी आवश्यक कच्चा माल आणि सुविधांची कमतरता भासू नये, याची प्रत्येक प्राचार्याने दक्षता घ्यावी. राज्य शासन हे कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात २६ हजार प्रवेशक्षमता निर्माण झाली असून, आतापर्यंत १८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थिनींचाही लक्षणीय सहभाग आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार विद्यार्थ्यांना तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पुढील टप्प्यात सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळाली. अध्यापकवर्ग आणि बाह्य तज्ज्ञांच्या सहभागातून असे अल्पमुदतीचे कार्यक्रम सातत्याने राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

आयटीआयचा ब्रँड अधिक चांगला व्हावा आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी दीक्षांत समारंभात व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित कौशल्यात प्रावीण्य मिळवावे, यासाठी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments