जगण्याचे अनुभव हेच लिखाण, पर्पल जल्लोष साहित्य जत्रेत सहभागी लेखकांचे प्रतिपादन
पिंपरी, दि. १७ जानेवारी २०२५ : साहित्य लिहितानाचा अनुभव, एक साहित्यिक म्हणून समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, समाजाचा दिव्यांग साहित्यिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, पुस्तक लिहिताना काय अनुभव येतात, जगण्याचे अनुभव लिखाण करताना कसे उपयुक्त ठरतात, अशा विविध विषयांवर लेखकांनी दिलखुलासपणे संवाद साधल्याने पर्पल जल्लोष कार्यक्रमातील साहित्य जत्रेत आयोजित केलेल्या ‘गप्पा लेखकांशी’ हा उपक्रम शुक्रवारी, १७ जानेवारी २०२५ रोजी चांगलाच रंगला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहित्य अकादमी विजेत्या लेखिका व अनुवादक सोनालीताई नवांगूळ (कोल्हापूर) आणि सातारा येथील लेखक बापू बोभाटे यांच्याशी संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळाली.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्लोष’ हा दिव्यांग महोत्सव पिंपरी-चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी साहित्य जत्रा कार्यक्रम झाला. यातील ‘गप्पा लेखकांशी’ या उपक्रमांत लेखिका सोनालीताई नवांगूळ व लेखक बापू बोभाटे यांनी लेखनाचे विविध पैलू उपस्थित रसिकांना उलगडून सांगितले.
एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर समाजातील अनेकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. त्यामुळे समाजात वावरताना विविध अनुभव दिव्यांग व्यक्तींना येत असतात. मात्र, हेच जीवनातील अनुभव तुम्हाला साहित्यिक बनवू शकतात, अशा प्रकारचा एक संदेशच या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला.
……
चौकट
लेखकांनी उघडले अंतरंग
लेखकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून लिखाण करावे. स्वतःच्या अनुभवाचे पुस्तक लिहिण्यास प्राधान्य द्यावे. संघर्ष, जीवन आणि जगण्याचे अनुभव म्हणजेच साहित्य असते, असे विविध मुद्दे कार्यक्रमात सहभागी झालेले सोनालीताई नवांगूळ आणि बापू बोभाटे यांनी मांडले. तसेच साहित्याचे अनुवाद करताना कशी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, याबाबतही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश छडवेलकर यांनी केले.


