Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ३७ हजार जणांची मोफत नेत्रतपासणी* *श्रीमंत दगडूशेठ...

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ३७ हजार जणांची मोफत नेत्रतपासणी* *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा उपक्रम*

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्ण सेवा अभियानात विविध स्वयंसेवी संस्था आणि हॉस्पिटल्सच्या सहकार्याने सन २०२४ सालामध्ये ३७ हजार २२२ लोकांची नेत्रतपासणी मोफत करण्यात आली. त्यातील १९ हजार रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

ट्रस्टच्या जय गणेश रुग्ण सेवा अभियानाच्या अंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग तसेच शिर्डी तालुक्यातील साकोरी गाव येथे वर्षभरात २६८ ठिकाणी नेत्रतपासणी आणि चिकित्सा शिबीरे घेण्यात आली. तपासणीत नेत्रदोष आढळलेल्या रुग्णांवर मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्रपटल यांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. डोळ्याचा चष्मा घालविणारी लॅसिक शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात आली.

नेत्रतपासणी चिकित्सा प्रामुख्याने वस्ती पातळीवर घेण्यात आल्या. यात ट्रस्टने नेत्र रुग्णवाहिका, मोफत आयड्रॉप्स तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही उपलब्ध करून दिले. डॉ.चित्रा सांबरे, डॉ.फाल्गुनी जपे, डॉ.संजिवनी आंबेकर, डॉ.अंबरीश दरक, डॉ.वैशाली ओक यांनी सहभाग घेतला आणि मार्गदर्शनही केले.नेत्रतपासणी आणि चिकित्सा शिबीराच्या आयोजनात सेवा भारती, सेवा आरोग्य, सेवा सहयोग, नाना पालकर स्मृती चिकित्सालय आदी २४ स्वयंसेवी संस्थांनी आयोजनात सहकार्य केले.

सत्यसाई नेत्रालय, व्हिजन नेक्स्ट आय केअर सेंटर, गॅलॅक्सी आय हॉस्पिटल, तेजोमयी आय केअर, रेणुका नेत्रालय, एच.व्ही.देसाई रुग्णालय आणि ससून रुग्णालयाचा नेत्रविभाग,लायन्स क्लब ऑफ कात्रज, अलायन्स क्लब पुणे अशा हॉस्पिटल्समध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांना रीडिंग चष्मे मोफत देण्यात आले, तसेच डॉक्टरांनी लिहून देण्यात आलेल्या रुग्णांना आय ड्रॉप्स ही मोफत उपलब्ध करून दिले जातात.

वर्षभरात नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया मोठ्या संख्येने करण्यात आल्या. यासाठी ट्रस्टच्या जय गणेश रुग्ण सेवा अभियानातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अपार मेहनत घेतली, असे रासने यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments